पावसाळा आणि मध्य रेल्वे यांचा एकमेकांशी ३६चा आकडा आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे उपनगरीय सेवेच्या काही फेऱ्या रद्द करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली. तर मंगळवारी कळव्याजवळ कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडीचा पेंटोग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ही गाडी कारशेडला नेईपर्यंत कल्याणकडे आणि मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली. अखेर सायंकाळी ६च्या सुमारास ही वाहतूक पूर्ववत झाली.
ठाण्याहून दुपारी चारच्या सुमारास बदलापूरला जाणारी ठाणे-बदलापूर ही गाडी कळवा स्थानकाजवळ असताना तिचा पेंटोग्राफ तुटला. त्यामुळे गाडी जागीच बंद पडली. परिणामी ठाण्याकडे येणाऱ्या तीन धीम्या गाडय़ा अडकून पडल्या. त्याचप्रमाणे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ाही जलद मार्गावरून काढण्यात आल्या. या गाडीची दुरुस्ती होऊन ती कारशेडकडे मार्गस्थ होण्यात तब्बल दोन तासांचा वेळ लागला. या दरम्यान ठाण्यापुढील धीम्या मार्गावरील वाहतूक दोन्ही दिशांनी जलद मार्गावरून वळवण्यात आली. परिणामी दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या खोळंब्यामुळे १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 2:36 am