25 February 2020

News Flash

वातानुकूलित लोकल सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर?

मध्य व पश्चिम रेल्वेला समान वातानुकूलित लोकल गाडय़ा मिळणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकल हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोरेगाव दरम्यान चालवण्याचा विचार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

चेन्नईतील रेल्वे कारखान्यातून मध्य व पश्चिम रेल्वेवर भेल कंपनीच्या इलेक्ट्रिक भाग असलेल्या दहा वातानुकूलित लोकल दाखल करण्याचा निर्णय घेतला. यात पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. त्यानंतर दुसरी लोकलही चार ते पाच महिन्यांपूर्वी दाखल झाली आणि त्याच्या चाचणीलाही सुरुवात केली असतानाच तिसरी लोकलही मुंबईत लवकरच येणार आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेला समान वातानुकूलित लोकल गाडय़ा मिळणार आहेत. यात मध्य रेल्वेवर येणारी पहिली लोकल सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत चालवण्याचा विचार केला जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीएसएमटी ते कल्याण आणि ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बरवरही वातानुकूलित लोकल चालवू शकतो. मात्र सीएसएमटीतून गोरेगावला जाणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची संख्याही अधिक आहे. सध्या पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रथम सीएसएमटी ते गोरेगाव अशी वातानुकूलित लोकल चालवण्याचा पर्याय निवडण्यावर विचार केला जात आहे. ती चालवताना कोणत्या तांत्रिक समस्या येऊ शकतात का तेही तपासले जात असल्याचे सांगितले. सध्या हार्बरवर सीएसएमटीतून वांद्रेपुढे जाणाऱ्या लोकल फेऱ्या या दर दहा मिनिटांनी उपलब्ध आहे. हे पाहिल्यास वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी हार्बरवर मार्ग उपलब्ध होत आहे. यामुळे गोरेगावपर्यंत वातानुकूलित लोकल धावल्यास ती गोरेगाव ते पनवेलही चालवू शकतो, असेही स्पष्ट केले. याआधी मध्य रेल्वेने प्रथम सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर वातानुकूलित लोकल चालवण्याचे निश्चित केले होते.

 

उंची जास्त

वातानुकूलित लोकलची उंची जास्तीत जास्त ४.२७० मीटर पाहिजे. पश्चिम रेल्वेवर दाखल झालेली पहिल्या वातानुकूलित लोकलची उंची ४.३३५ मीटर असून ती जास्त आहे. मध्य रेल्वे अखत्यारित असलेल्या पुलांची कमी असलेली उंची आणि वातानुकूलित लोकलची जास्त उंची पाहता यापूर्वीची पहिली लोकल चालवण्यास मध्य रेल्वेने नकार दिला होता. त्यामुळेच मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर वळवण्यात आली. आता येणाऱ्या लोकलची उंची मर्यादित असावी, असे चेन्नई रेल्वे कारखान्याला कळवले आहे.

First Published on August 20, 2019 2:12 am

Web Title: central railway to run first ac local train from cstm to goregaon zws 70
Next Stories
1 उच्च रक्तदाबाच्या निदान आणि उपचाराकडे दुर्लक्ष
2 सायबर गुन्ह्य़ांची उकल करण्यात अडथळे
3 हृदयदोष असलेल्या बाळावर वेळेत उपचार
Just Now!
X