छगन भुजबळांच्या अडचणींत वाढ

काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्य़ात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर हे न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचे सनदी लेखापाल सुनील नाईक यांना सक्तवसुली महासंचालनालयाने अटक केली आणि नंतर त्यांची ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. नाईक यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखविल्यावर महासंचालनालय तसेच नाईक यांनी स्वत: तसा अर्ज करावा, असे आदेशही विशेष न्यायालयाने दिले. यामुळे भुजबळांपुढील अडचणीत आणखीच वाढ होणार आहे. माफीचा साक्षीदार झाल्यास नाईक यांच्या जामिनाचा मार्गही मोकळा होणार आहे.

विशेष न्यायालयाने पंकज भुजबळ यांच्यासह ३० जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ११ मेपर्यंत या सर्वाना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. त्यातच महासंचालनालयाने यापैकी अनेकांच्या घरी छापे टाकले. त्यापैकी फक्त नाईक हे घरी आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयात हजर करताना ते माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. भुजबळांच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवणाऱ्या नाईक यांच्या या कृतीमुळे आता भुजबळांविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यास महासंचालनालयाला मदत होणार आहे.

परवेश कन्स्ट्रक्शन आणि आर्मस्ट्राँग एनर्जी लि. या कंपन्यांचे समभाग चढय़ादराने रोख रकमेच्या मोबदल्यात कोलकता येथील विविध बनावट कंपन्यांना विकून त्याऐवजी धनादेशाद्वारे मोठय़ा प्रमाणात रक्कम घेण्यात आल्याची जबानी नाईक यांनी दिली होती. आपल्या कंपन्यांचे समभाग बनावट कंपन्यांना विकण्यात आले असले तरी तो व्यवहार सनदी लेखापाल नाईक पाहत होते, अशी जबानी देऊन समीर भुजबळ यांनी नाईक यांना अडचणीत आणले होते. परंतु समीर भुजबळ यांच्या आदेशावरूनच रोख रकमेची आपण विल्हेवाट लावली, असे नाईक यांनी स्पष्ट केले होते. भुजबळांविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करताना हेच मुद्दे पुरावे म्हणून उपयोगी पडणार आहेत. त्यामुळेच नाईक यांना माफीचा साक्षीदार केल्यास भुजबळांच्या आणखी काही काळ्या व्यवहाराची माहिती मिळू शकेल, असा विश्वास महासंचालनालयाला वाटत आहे.

दरम्यान, पंकज भुजबळ यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असल्यामुळे त्यांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

  • भुजबळांच्या विरोधात मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील काही कर्मचारीही माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते
  • सनदी लेखापालाला माफीचा साक्षीदार करून महासंचालनालयाने भुजबळ यांच्याविरुद्ध अगोदरच दाखल केलेले आरोपपत्र अधिक ठोस केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
  • आता भुजबळांना थेट खटल्याला सामोरे जावे लागेल. तोपर्यंत त्यांची जामिनावर सुटका होण्याचीही शक्यता नाही