News Flash

किरकोळ बाजारात चिकन दर २२० ते २४० रुपयापर्यंत वाढले

करोनाच्या साथीमुळे पोल्ट्री व्यावसायाला मोठा फटका बसला होता. बाजारात चिकनच्या दरात मोठी घट झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : कोंबडय़ांच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांकडे चिकनचे दर किलोमागे २२० ते २४० रुपयांपर्यंत वधारले आहेत. जानेवारी महिन्यात आलेल्या बर्ड फ्लू रोगामुळे चिकनची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने दरात वाढ झाली आहे.

मुंबईतील घाऊक बाजारात कोंबडय़ांची आवक घटल्याने शनिवारी आणि रविवारी कोंबडय़ांची आवक कमी झाली. त्यामुळे चिकनचे दर वाढले आहेत. एक महिन्यापूर्वी साधारणपणे किरकोळ स्वरूपात चिकन विक्रीचा दर १६० रुपये किलो होता. तर १५ दिवसांपूर्वी १८० रुपयापर्यंत पोहचला होता. आठवडाभरापासून हा दर वाढून २२० रुपयापर्यंत पोहचला आहे. मालाची कमतरता राहिल्यास आणखी दर वाढतील,‘ अशी शक्यता इरफान मोमीन या विक्रेत्याने व्यक्त केली आहे. ‘सध्या घाऊक बाजारात मागणी वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांना १३१ रुपये किलो याप्रमाणे कोंबडय़ा विकत घ्याव्या लागत आहेत. त्यातून सध्या २२० रुपयापर्यंत चिकनचे दर गेले आहेत,‘ असे बोरीवली येथील स्वराज्य चिकन शॉपचे सुशील हुले यांनी सांगितले.

करोनाच्या साथीमुळे पोल्ट्री व्यावसायाला मोठा फटका बसला होता. बाजारात चिकनच्या दरात मोठी घट झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुमारास चिकनचे दर काहीसे वाढले. मात्र, ‘जानेवारी महिन्यात आलेल्या बर्ड फ्लू रोगाच्या साथीने चिकनची मागणी पुन्हा घटली होती. त्यावेळी पोल्ट्री व्यावसायिकांकडील कोंबडय़ा विकल्या गेल्या नाहीत. त्याचबरोबर बर्ड फ्लूच्या धास्तीने अनेकांनी पोल्ट्रीमध्ये नवीन पिल्ले आणली नाहीत. त्यातून पोल्ट्री उत्पादनाच्या साखळीत खंड पडला. त्याचबरोबर कडक उन्हाळ्यामुळे कोंबडय़ांची वाढही कमी होते. त्यामुळेही पुरवठा कमी झाला आहे. यातून सद्यस्थितीत बाजारात मागणीपेक्षा पुरवठा १० ते १५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे चिकनचे घाऊक बाजारातील भाव १२० ते १३०  रुपयापर्यंत वाढलेआहेत. आणखी एक ते दोन आठवडे ही परिस्थिती राहिल. त्यानंतर पुरवठा सुरळीत होईल,‘  अशी माहिती पोल्ट्री फार्मस अँड ब्रीडर असोसिएशनचे अध्यक्ष वसंतकुमार शेट्टी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:29 am

Web Title: chicken prices in the retail market akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती’बाबत नाराजी
2 गरजेएवढय़ाच कामगारांना कामावर बोलवा
3 ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन
Just Now!
X