मुंबई : ‘मी मराठी, माझी मराठी’ हा बाणा जपूया, असे आवाहन मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर वैयक्तिक जीवनात, सार्वजनिक व्यवहारात मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवू ,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा शिरवाडकर यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंती निमित्त अभिवादन केले आहे. मराठीला माय मराठी म्हणण्याचा, अमृतातेही पैजा जिंकणारी भाषा म्हणून तिचा अभिमान मिरविण्यासाठी मी मराठी, माझी मराठी! असा बाणा जपू या! त्यासाठी मराठीत बोलू, व्यक्त होऊ. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू. मराठीतील लेखन-वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचे स्वीकार करू. मुलांमध्ये, तरुणांमध्ये मराठीची ओढ वाढावी, तिची गोडी लागावी यासाठी कलाविष्कार, मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रयत्नांचे स्वागत करू. नव तंत्रज्ञान, नव माध्यमात, समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर करू, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही? या आपल्या भूमिकेचा देखील मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे.
तर मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. मराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. हे करत असतानाच मराठी भाषेची उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मराठी ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळाले पाहिजे. संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच औद्योगिक, आर्थिक, न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून वैयक्तिक जीवनात, व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.