मुंबई : दिवसरात्र असलेले ढगाळ, कुंद हवामान, रात्री काही ठिकाणी होणारा तुरळक पाऊस आणि दिवसाच्या तापमानात झालेली घट ही स्थिती मुंबई आणि उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, उत्तर महाराष्ट्रावर असलेली चक्रवाती वर्तुळाकार स्थिती या सर्व घडामोडींमुळे शुक्रवारी मुंबईच्या कमाल तापमानात अचानक पाच अंशांची घट झाली, तसेच तुरळक पावसाचीदेखील नोंद झाली. हीच स्थिती रविवारीदेखील कायम राहिली. शुक्रवारच्या कमाल तापमानात शनिवारी दोन अंशांची वाढ झाली, मात्र रविवारी त्यामध्ये पुन्हा घट होऊन कुलाबा केंद्रावर २७.४ अंश आणि सांताक्रूझ केंद्रावर २७.६ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. मोसमातील हे सर्वात कमी कमाल तापमान आहे. ढगाळ हवेमुळे शुक्रवारपासून वाढलेल्या किमान तापमानात फारशी घट झाली नसून ते २३.५ अंश नोंदविण्यात आले.

शनिवारी रात्री आणि रविवारी  पहाटे मुंबई आणि परिसरात तुरळक पावसाची नोंद झाली. कुलाबा, सांताक्रूझ, मालाड, कांदिवली, राम मंदिर आणि ठाणे परिसरात सुमारे एक मिमी पावसाची नोंद झाली.

आजही पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील घडामोडींमुळे सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्य़ांत  पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दोन दिवसांत नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्य़ात काही ठिकाणी ३७ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

कमाल तापमानात घट

ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात झालेली घट ही सरासरीपेक्षा पाच अंश खाली असून, त्याचवेळी किमान तापमान हे सरासरीपेक्षा पाच अंशाने अधिक आहे.