करोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात नागरिक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत.  यामुळे आजवर अटोक्यात असलेली ही साथ वाढून आव्हान उभे राहील असे सांगताच महानगर प्रदेशातील लोकांच्या मुक्त संचाराला वेळीच लगाम घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पोलिसांना दिले.

कामाशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मुभाही दिली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसर , मीरा-भाईंदर,भिवंडी आदी  शहरांमध्ये मोकाटपणे फिरणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला जाईल. पावसाळा, करोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी  मुंबई पोलिसांनी घातलेल्या २ किमी अंतराच्या निर्बंधाचे  समर्थन करताना हे आदेश दिले.

नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही पण कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, तर तुम्ही धोका वाढवीत आहात हे लक्षात ठेवा,असा इशाराही  मुख्यमंत्र्यांनी दिला.