राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा नेते अजित पवार यांच्या जलसंपदा खात्याला लक्ष्य केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी छगन भुजबळ यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी टोलनिश्चितीमधील अपारदर्शक पद्धतीवरून भुजबळ यांना सणसणीत टोला तर दिलाच, परंतु त्याचबरोबर जलसंपदा खात्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम खात्याची सूत्रेही आयएएस अधिकाऱ्याच्या हाती देण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत.
प्रस्तावित प्रकल्पाच्या मार्गावर सात दिवस माणसे बसवून येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ांची नोंद करायची व त्यावरून वाहनसंख्येचा अंदाज काढून टोलचा दर आणि कालावधी ठरवायचा अशी ही पद्धत आहे. त्याऐवजी अशा ठिकाणी एक इलेक्ट्रॉनिक नोंदणी यंत्रणा बसवावी. त्यामुळे दर तासाला, दिवसाला किती वाहने ये-जा करतात याची नोंद होऊन वाहतुकीचे खरे आकडे समोर येतील. याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभागांना (‘एमएसआरडीसी’सुद्धा) सूचना केली. पण त्यांना ते अमान्य आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भुजबळांवरच बाण सोडला.  
दुसरीकडे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान सचिवपदीही आयएएस अधिकारी आणण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर सार्वजनिक बांधकामसारख्या महत्त्वाच्या खात्यावरही वर्चस्व प्रस्थापित करून भुजबळांबरोबच राष्ट्रवादीलाही धक्का देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही खेळी असल्याची चर्चा आहे.