काम करताना अहंकार नको असे आपण म्हणता, परंतू काम करताना ‘शार्ट कट’ही घेता कामा नये. नाही तर शॉर्टकट घेताना दिवसाची कामे रात्री करावी लागतात.आम्ही मात्र रात्री चालणारी कामेही दिवसाढवळया करतो, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आरे कारशेडच्या बाबतीत तज्ज्ञांना सोबत घेऊन काम करतो आहोत. जो खर्च झाला आहे, तो वाया जाऊ नये याचा विचार करून पावले टाकत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘अहंकाराने वागू नका’, असा सल्ला ठाकरे यांना दिला होता. त्याला प्रत्युतर देताना ठाकरे बोलत होते. शार्टकट घेण्याच्या सवईतून आरेतील झाडे रात्रीत कापावी लागली असे सांगत दिवसाची कामे रात्री केली की काय होते याची अजितदादांनाही कल्पना असल्याचे सांगत फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेकडे लक्ष वेधले. आरेमधील सहाशे एकर जमीन जंगलासाठी राखीव ठेवत आहोत.   महानगराच्या मध्यभागी  मोठय़ा प्रमाणावर जंगल असेल. याठिकाणी वन्यजीव देखील असतील. देशातील कुठल्याही राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव नाहीत असे सांगत मुंबईसाठी इतर सोयी सुविधा देत असताना, मुंबईच्या पर्यावरणासाठी सहजीवनासाठी ही संपदा जोपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून २९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले असून त्यांना कर्जाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी कृषीक्षेत्रात आमुलाग्र सुधारणा करण्यात येत आहेत. तसेच येत्या वर्षभरात  साडे सहा लाखआदिवासी कुपोषित बालकांना दूध भुकटी देण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. करोना संकटात सरकार आणि जनता खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे लढा देतो आहोत. राज्यातील बाधितांची संख्या वाढत असून गाफील राहून चालणार नाही. सरकार म्हणून खंबीरपणे पाऊल टाकतो आहोत. मार्चमध्ये केवळ तीन प्रयोगशाळा होत्या. आता जवळपास पाचशे तीस प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. आजपर्यंत आरोग्य हा विषय मागे पडला होता. करोनाच्या संकटातून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मुंबईबरोबरच राज्यात आरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी उभ्या केल्या जातील. करोना विरोधात आतातरी  प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हेच आपल्या हातात आहे. सगळ्या गोष्टी कायद्याने करता येत नाही. जनतेला त्यांचे हित कशात आहे, हे नीटपणे सांगण्याची आणि या  आजारासोबत कसे जगायचे याचे शिक्षण देण्याची गरज असून जनजागृतीच्या लढय़ात विरोधकांनीही सहकार्य करावे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

माझे कुटुंब.. नवे अभियान

करोना विषाणुला रोखण्यासाठी राज्यभर आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक, गट प्रवर्तक, आणि एकूणच या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबबदारी ‘हीराज्यव्यापी मोहीम राबविण्याची घोषणा ठाकरे यांनी केली. पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबपर्यंत घरोघर आरोग्य चौकशी केली जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात घरातील कुटुंबांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, त्यांना इतर कोणते आजार आहेत का, हृदयविकार, मधुमेह, किडणी, लठ्ठपणा यासारख्या आजार असणाऱ्या व्यक्ती शोधण्यात येतील.  या व अनुषंगाने इतर आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येणार आहे.  ही मोहीम सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाऊन गाव, वाडी, पाडे येथील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.