केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश करण्यात आलेल्या अकरा शहरांपैकी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अमरावती व नागपूर या महानगरपालिकांच्या २०१७ मध्ये निवडणुका होणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. नेमक्या निवडणुका होणाऱ्या महापालिकांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश हा योगायोग की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्मार्ट राजकीय खेळी, अशी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रातील भाजप सरकारने देशातील शंभर शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना जाहीर केली. त्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले. राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर, या योजनेत कोणत्या शहरांचा समावेश करायचा, याचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या शहरांतील आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था इत्यादी पायाभूत सुविधांच्या नियोजनबद्ध विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून बक्कळ निधी मिळणार आहे.
केंद्राकडून मिळणाऱ्या अधिकच्या निधीचा या शहरांच्या विकासासाठी उपयोग करता येणार आहे. अर्थात त्याचे राजकीय श्रेय घेण्याची संधी सत्ताधारी पक्ष सोडणार नाही. या पूर्वीच्या केंद्रातील काँग्रेस सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी नूतनीकरण अभियानाच्या (जेएनयूआरएम) माध्यमातून राज्यातील आघाडी सरकारनेही मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड व अन्य काही शहरांमधील विकासकामांसाठी निधी आणून आपले राजकीय बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला होता.
आता भाजप सरकारने जेएनयूआरएमच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरांमध्ये राजकीय घडी बसवण्याचा भाजपचाही प्रयत्न राहणार आहे, असे बोलले जात आहे.
निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या महापालिकांपैकी एक नागपूरचा अपवाद वगळला तर, अन्यत्र भाजपची राजकीय ताकद बेताचीच आहे. मुंबई, ठाण्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. नाशिकमध्ये मनसेची सत्ता आहे. पुणे, िपपरी-चिंचवड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गड आहेत. सोलापूर, अमरावतीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून भाजपचा आगामी नऊ महापालिका निवडणुकांमध्ये आपले राजकीय बस्तान बसविण्याचा प्रयत्न होईल, अशी चर्चा आहे.

अशोक चव्हाण यांची टीका
राज्य सरकारने स्मार्ट सिटी योजनेत नांदेड, लातूर व परभणी या शहरांचा समावेश केला नसल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. शहरांची निवड करताना सरकारने राजकीय दुजाभाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.