अनेक विषय शाखांच्या विद्यार्थ्यांना फटका
लग्नाची घटिका जवळ आली आहे.. वधू-वर हातात माळा घेऊन उभे आहेत.. नातेवाईक अक्षता घेऊन ताटकळत आहेत.. अशा प्रसंगी लग्न लावणाऱ्या गुरुजींचाच पत्ता नसेल तर काय? मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्येही येत्या ६ जूननंतर अशीच काहीशी परिस्थिती उद्भवणार आहे. अनेक विषयशाखांचे अभ्यासक्रम तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने सोमवारपासून महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवायचे काय, असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे.
नव्या विद्यापीठ कायदा येणार म्हणून राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या प्राधिकरणांच्या निवडणुका स्थगित केल्या गेल्या. त्यामुळे अभ्यासक्रम तयार करणाऱ्या अभ्यासमंडळाच्या नेमणुकाच झालेल्या नाहीत. विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाची मुदत गतवर्षी ३१ ऑगस्ट रोजी संपली. त्यानंतर हंगामी अभ्यासमंडळे करून हे काम मार्गी लावणे आवश्यक होते. मात्र ती प्रक्रियाच रखडल्याने आता मे महिना संपूनदेखील अनेक विषयांचे अभ्यासक्रम तयार झालेले नाहीत.
अभ्यासक्रम नसल्याचा सर्वाधिक फटका २०१४-१५ मध्ये प्रवेशित झालेल्या बीकॉम-फायनान्शिअल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, बीएमएस, बीएस्सी मायक्रोबायोलॉजी आदी सात-आठ विषयांच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या विषयांचा अभ्यासक्रम त्या वर्षी आणि त्यानंतरच्या वर्षी बदलण्यात आला होता. नियमाप्रमाणे याही वर्षी तृतीय वर्षांत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बदलणे आवश्यक होते. एरवी अभ्यासक्रम बदलाची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू होते. अभ्यास मंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमावर विद्वत परिषदेने मान्यतेची अंतिम मोहोर उमटविल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात सुधारित अभ्यासक्रमाकरिता अध्यापकांचे प्रशिक्षण होते. परंतु यंदा अभ्यासक्रमांबाबत प्राध्यापकांना प्रशिक्षित करणेही शक्य होणार नाही.

१५ विषयांचे अभ्यासक्रम एका महिन्यात
जागतिक उंचीवर पोहोचण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुंबई विद्यापीठाचे अभ्यासक्रम अतिशय सखोल संशोधनाने करणे आवश्यक होते. परंतु वेळ नसल्याने अवघ्या १५ ते २० दिवसांत अभ्यासक्रम लिहून काढले गेले आहेत. बीएमएसच्या १५ विषयांचा अभ्यासक्रम तर ३० दिवसांत मार्गी लावला गेल्याचे समजते.

नवीन कायदा येण्याआधीच प्राधिकरणांच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे शैक्षणिक काम ठप्प पडेल, ही भीती आम्ही आधीच वर्तवली होती. आताही कुलगुरूंनी नामनियुक्त केलेल्या अध्यापकांमार्फत अभ्यासक्रम बदलाचे प्रयत्न चुकीचे आहेत.
– बॉम्बे युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स युनियन

कोणतेही काम ठप्प पडू नये यासाठी कुलगुरूंनी विशेषाधिकार वापरून ‘विशेष कार्यगट’ नामनियुक्त केले आहेत. त्या अनुषंगाने ३४ विशेष कार्यगट नेमण्यात आले आहेत. तसेच, ६० तदर्थ (अ‍ॅडव्हॉक) गटही नेमण्यात आले होते. त्यांच्यामार्फत आम्ही अभ्यासक्रम बदलाचे काम करतो आहोत.
– लीलाधर बन्सोड, उपकुलसचिव, जनसंपर्क