उद्याच्या मॅरेथॉनसाठी स्पर्धकांचा सराव; रेल्वेच्या अतिरिक्त गाडय़ा तर ‘बेस्ट’च्या मार्गात बदल

मुंबई : रोजगार, कुटुंब, शिक्षण, करिअर अशा वेगवेगळय़ा कारणांसाठी दररोज घडय़ाळय़ाच्या काटय़ावर धावणारे मुंबईकर उद्या, रविवारी स्वत:च्या आरोग्यासाठी आणि सामाजिक जागृतीचे संदेश घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसतील. त्यासाठी सुरू असलेला स्पर्धकांचा सराव आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धेसाठी मुंबई महापालिकेसह सर्व प्रशासकीय व पोलीस यंत्रणाही सज्ज असून स्पर्धकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी विविध वाहतूक बदल आणि अतिरिक्त रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मॅरेथॉनसाठी दक्षिण-मध्य मुंबईतील बहुतांश सर्वच प्रमुख मार्ग रविवारी पहाटे तीनपासून वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत. स्पर्धा सुरू होणारी ठिकाणे आणि वाहनतळांच्या व्यवस्थेत बरेच अंतर असल्याने स्पर्धकांची गैरसोय होऊ शकेल, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अर्ध मॅरेथॉनची सुरुवात वरळी डेअरीपासून होणार आहे. तिथपर्यंत वाहने जाऊ शकणार नाहीत. इथे येणाऱ्या स्पर्धकांसाठी वाहने उभी करण्याचा फिनिक्स मॉल हा अखेरचा पर्याय असेल. तिथून वरळी डेअरीपर्यंतचे अंदाजे दोन किलोमीटर अंतर स्पर्धकांना पायी कापावे लागेल. सीएसएमटी येथेही अशीच परिस्थिती असल्याने स्पर्धकांनी उपनगरीय लोकलसेवेचा पर्याय निवडल्यास गैरसोय टाळता येईल.

या स्पर्धेसाठी दक्षिण, मध्य मुंबईत येणारे सुमारे ७१ मार्ग रविवारी पहाटे पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील. तर सुमारे २८ प्रमुख रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी असेल. बंद रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांना माहिती मिळावी यासाठी वाहतूक पोलीस शनिवारी मध्यरात्रीपासून दक्षिण, मध्य मुंबईत टप्प्याटप्प्यावर तैनात असतील. दक्षिण, मध्य मुंबईतील सर्व सार्वजनिक, स:शुल्क वाहनतळांचा वापर करता येतील.  तसेच दक्षिण, मध्य मुंबईतील बेस्ट आगारांमध्येही वाहने उभी करण्याची मुभा असेल.

अतिरिक्त लोकल फेऱ्या

रविवारी पहाटे ३ वाजता कल्याणहून धिमी लोकल सीएसएमटीसाठी सुटेल. ही लोकल दिवा ते मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर धावेल.पनवेलहूनही सकाळी ३.१० वाजता सीएसएमटीसाठी लोकल सोडण्यात येईल. पश्चिम रेल्वेवरही विरार स्थानकातून १८ जानेवारीच्या मध्यरात्री २.२० वाजता लोकल सुटेल आणि ही लोकल १९ जानेवारीच्या पहाटे ४.०२ वाजता चर्चगेटला पोहोचेल. बोरिवली स्थानकातूनही १९ जानेवारीच्या पहाटे सव्वातीन वाजता लोकल सोडण्यात येईल.

बसमार्गात बदल

मॅरेथॉनमुळे बेस्ट बस फेऱ्या रद्द केल्या असून काही फेऱ्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. रविवार दुपारी ३.३० पर्यंत बसमार्ग क्रमांक १०५, १०६, १०८, ११२, १२३, १२५, १३२, १३३, १३६ व १५५ तात्पुरते रद्द राहील. मॅरेथॉनचा मार्ग असलेल्या रस्त्यावरील बसचौक्यादेखील दुपारी साडेतीनपर्यंत बंद ठेवण्यात येतील. भेंडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा, नेव्हीनगरकडे होणारे बसमार्ग हे सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाडीबंदर, पी. डीमेलो रोड आणि शहीद भगतसिंग मार्गाने जातील.

वाहनतळाची सुविधा

स्पर्धकांच्या वाहनांसाठी बॅ. रजनी पटेल मार्ग, एस. व्ही. पी. मार्ग, विधानभवनाबाहेर, बॅलार्ड पीअर आणि टाटा मार्गावरील महापालिकेचे वाहनतळ, केशवराव खाडे मार्ग, कुरणे चौक ते वरळी नाका, सेनापती बापट मार्गाच्या दोन्ही बाजू, वडाचा नाका ते शिंगटे मास्तर चौक, एन. एम. जोशी मार्गाच्या दोन्ही बाजू, शिंगटे मास्तर चौक ते चिंचपोकळी रेल्वे स्थानक चौक, माटुंगा रोड रेल्वे स्थानक ते मच्छीमार वसाहत, एलफिन्स्टन चौक ते माहीम चौक या मार्गावर पार्किंगला परवानगी देण्यात आली आहे.

एकूण सात स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

पूर्ण मॅरेथॉन- पहाटे ५.१५

१० किलोमीटर-स. ६.२०

एलिट स्पर्धा -स. ७.२०

अपंगांसाठी स्पर्धा – स. ७.२५

ज्येष्ठ नागरिक – स. ७.४५

ड्रीम रन – स. ८.०५

  • वरळी डेअरी

अर्ध मॅरेथॉन-पहाटे ५.१५

विशेष वैद्यकीय सुविधा

स्पर्धा मार्गावरील रुग्णालयांत डॉक्टरांचे पथक  सज्ज असेल. याशिवाय ठिकठिकाणी रुग्णवाहिका तैनात असतील. रुग्णवाहिकेला कमीत कमी वेळेत रुग्णालयात पोहोचता यावे यासाठी वाहतूक पोलिसांचा रायडर सज्ज असेल.