मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांना हटवावे म्हणून पक्षाच्या नेत्यांनी राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे. मुरली देवरा अध्यक्ष असल्यापासून मुंबई काँग्रेसमध्ये वादाची परंपरा कायम आहे.

निरुपम यांच्या विरुद्ध मिलिंद देवरा आणि गुरुदास कामत गट एकत्र आला आहे. निवडणुकीत निरुपम यांना अध्यक्षपदी कायम ठेवल्यास मुंबईत काँग्रेसचे नुकसान होईल, असे या नेत्यांनी खरगे यांच्या निदर्शनास आणून दिले. निरुपम यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांची अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी पक्षांतर्गत विरोधकांची मागणी होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा निरुपम यांना पाठिंबा आहे. म्हणूनच पक्षांतर्गत विरोधकांनी राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मिलिंद देवरा यांचे नाव पुढे केले आहे. निरुपम अध्यक्षपदी कायम राहिल्यास विधानसभेच्या वेळी उमेदवारी मिळणे कठीण जाईल, अशी काही नेत्यांना भीती आहे. काही ठिकाणी प्रस्थापित नेत्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना निरुपम यांनी ताकद दिल्याने वाद वाढल्याचे समजते.

मुंबई काँग्रेसमध्ये अध्यक्षांच्या विरोधात अन्य नेत्यांनी एकत्र येण्याची परंपराच आहे. मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसचे २२ वर्षे अध्यक्ष होते. १९८५ मध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि शिवसेना सत्तेत आली होती. तेव्हा देवरा यांना हटविण्याची मागणी झाली होती. देवरा यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पक्षांतर्गत नेत्यांना तेव्हा चोप देण्यात आला होता. देवरा आणि गुरुदास कामत यांच्यात पुढे जोरदार शीतयुद्ध झाले. देवरा यांना दूर करून पक्षाने गुरुदास कामत यांच्याकडे अध्यक्षपद सोपविले. कामत अध्यक्ष झाल्यावर देवरा गट, कृपाशंकर सिंग आदी नेत्यांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. कामत यांच्यानंतर अध्यक्ष झालेल्या कृपाशंकर सिंग यांच्या विरोधात पक्षांतर्गत वाद झाला होता. कामत गटाबरोबरच अन्य काही नेते कृपाशंकर सिंग यांच्या विरोधात गेले. कृपाशंकर सिंग यांच्यानंतर अध्यक्ष झालेल्या जनार्दन चांदूरकर यांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोधक एकवटले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यावर संजय निरुपम यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निरुपम यांच्या विरोधात गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड हे सारेच नेते विरोधात गेले.

निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांना बदलले जाण्याची शक्यता कमी असली तरी पक्षांतर्गत विरोधकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यास त्यांना सांगण्यात येईल, अशी शक्यता आहे.