एक दशक प्रदेश काँग्रेसशी संबंधित; दोन्ही प्रदेशाध्यक्षांशी उत्तम संबंध
मुंबई : मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा उल्लेख करण्यात येत असल्याने काँग्रेसच्या राजकारणात महाराष्ट्राचे प्रभारीपद हे महत्त्वाचे मानले जाते. यामुळेच स्थिरस्थावर होण्यापूर्वीच राज्याच्या प्रभारीला बदलण्यात येत असे. पण मोहन प्रकाश यांना प्रभारी आणि त्या आधी सहप्रभारी अशी तब्बल जवळपास दहा वर्षांची कारकीर्द मिळाली आहे. एवढी कारकीर्द कोणत्याच प्रभारींच्या वाटय़ाला आलेली नाही.
समाजवादी चळवळीची पाश्र्वभूमी असलेल्या मोहन प्रकाश यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्याकडे महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून २००८च्या सुमारास नियुक्ती झाली होती. तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी हे राज्याचे काँग्रेसचे प्रभारी असताना मोहन प्रकाश हे सहप्रभारी होते. अॅन्टोनी यांच्याकडे केंद्रात महत्त्वाची जबाबदारी असल्याने मोहन प्रकाश हेच राज्याच्या पक्षाच्या कारभारात लक्ष घालत असत. २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मोहन प्रकाश यांना राज्याचे प्रभारी म्हणून बढती देण्यात आली. तेव्हापासून गेली आठ वर्षे मोहन प्रकाश हे राज्याचे प्रभारीपद भूषवीत होते. तीन-चार वर्षांपेक्षा अधिक काळ नेत्याला राज्याच्या प्रभारीपदी ठेवले जात नाही. पण मोहन प्रकाश यांना तब्बल दहा वर्षे राज्यात मिळाली आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य काँग्रेसमध्ये संपूर्ण बदल अपेक्षित होते. यानुसार तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदलण्यात आले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हाच राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडून पदभार काढला जाईल, अशी शक्यता होती. पण मोहन प्रकाश हे पदावर कायम राहिले. मोहन प्रकाश यांना बदलण्याची मागणी राज्यातील नेत्यांकडून गेली दोन-तीन वर्षे सुरू होती. पण राहुल गांधी यांचा विश्वास संपादन केलेल्या मोहन प्रकाश यांना राज्याचे प्रभारी म्हणून कायम ठेवण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्षांशी जुळवून घेतले
काँग्रेसच्या राजकारणात दिल्लीहून प्रभारी म्हणून पाठविण्यात येणाऱ्या नेत्याचे राज्याचे मुख्यमंत्री वा प्रदेशाध्यक्षांशी तेवढे मधुर संबंध नसत. वायलर रवी हे राज्याचे प्रभारी असताना त्यांचे आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्याशी अजिबात पटत नसे. मार्गारेट अल्वा या राज्याच्या प्रभारी असताना त्यांचे आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातून विस्तवही जात नव्हता. एवढी कटुता दोन्ही नेत्यांमध्ये होती. या तुलनेत मोहन प्रकाश यांचे माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाण या त्यांच्या काळीतल दोन्ही प्रदेशाध्यक्षांशी चांगले संबंध राहिले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मोहन प्रकाश यांना तेवढे महत्त्व देत नसत. राज्याचे प्रभारी म्हणून मुख्यमंत्री वा प्रदेशाध्यक्षांशी टोकाची भूमिका घेण्याचे मोहन प्रकाश यांनी टाळले होते. राज्यातील काँग्रेस नेत्यांशी मोहन प्रकाश यांनी संबंध प्रस्थापित केले होते.
गेल्या दोन वर्षांपासून मोहन प्रकाश यांच्या विरोधात राज्यातील नेत्यांनी दिल्लीत तक्रारींचा सपाटा लावला होता. काही ठरावीक नेत्यांनाच मोहन प्रकाश हे झुकते माप देतात, असा त्यांच्यावर आरोप केला जात होता. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावर मोहन प्रकाश यांच्याकडून राज्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.