राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून या योजनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या राज्य सरकारच्या योजनेस काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. बाळासाहेबांच्या नावे दुसरी एखादी योजना सुरू करा, पण गांधी यांचे नाव बदलू नका, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राजीव गांधी जीवनदायी योजना हा काँग्रेसचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम होता. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत काही लाख शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याकरिता सुरेश शेट्टी आरोग्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती. सत्ताबदलानंतर आरोग्य खाते शिवसेनेच्या वाटय़ाला आले आणि या योजनेच्या माध्यमातून राजकीय लाभ घेण्याचा आता शिवसेनेचा प्रयत्न आहे. यासाठीच या योजनेचे नामांतर करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची योजना आखण्यात आली असून, त्यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविला आहे. शिवसेनेच्या नामांतराच्या या योजनेस काँग्रेसने विरोध केला आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे लाखो गोरगरिबांना लाभ मिळाला आहे. पण नव्या सरकारच्या काळात राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी योग्यपणे होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. लोकहितकारी योजनांमध्ये राजकारण आणण्याऐवजी त्याचा गुणात्मक दर्जा सुधारण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. या योजनेला ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असल्यास ते चुकीचे आहे, असेही मत त्यांनी मांडले आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या नामांतराबाबत ‘लोकसत्ता’ने १७ ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.