07 March 2021

News Flash

रुग्ण तसेच मृतांची संख्या दडविण्याचे प्रकार अतिशय गंभीर – देवेंद्र फडणवीस

"आरोग्य सेवेतील अनेक डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे"

संग्रहित छायाचित्र.

राज्यातील आरोग्य व्यवस्था अतिशय वाईट असून ती पूर्णतः कोलमडली आहे. सायन रुग्णालयात तर मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांना आता बेड्स मिळणे कठीण झाले आहे. करोना नसलेल्या रुग्णांचे सुद्धा मोठे हाल होत आहेत. आरोग्य सेवेतील अनेक डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाने यात तत्काळ लक्ष घालावे. करोना रूग्णांच्या संपर्कात येणार्‍यांचा शोध आता थांबला आहे. लक्षणे नसलेल्यांच्या चाचण्या बंद करण्यात आल्या आहेत. रुग्ण तसेच मृतांची संख्या दडविण्याचे प्रकार अतिशय गंभीर आहेत, यात सुद्धा सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी ही मागणी केली.

“राज्यात पोलिसांवर होत असलेले हल्ले, त्यांचे खचलेले मनोबल, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि दुसरीकडे कोडमडलेली आरोग्य यंत्रणा याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शेतमाल खरेदी, खरीप हंगामासाठी मदत आणि स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष द्या,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “क्वारंटाईन सेंटर्सची अवस्था तर अतिशय वाईट आहे. तेथे निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात आहे. याकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यावे. अधिकार्‍यांमध्ये योग्य समन्वय नाही. अशाप्रसंगी राजकीय नेतृत्वाने हा समन्वय घडविला पाहिजे,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा प्रश्न गंभीर आहे. सुमारे २५ हजार मजूर पायी रस्त्याने प्रवास करीत आहेत. केंद्र सरकार रेल्वेसेवा देण्यास तयार आहे. त्यामुळे त्यांना पायी जाण्यापासून रोखून तत्काळ रेल्वेने प्रवास करता येईल, हे सुनिश्चित करावे. रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याबद्दलच्या तक्रारी कायम आहेत. जे धान्य दिले जातेय ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. रेशनकार्ड नसलेल्यांना पण इतर छोटी राज्ये धान्य देत आहेत. महाराष्ट्राने सुद्धा ते करावे. मालेगाव येथे मागच्यावर्षीच्या तुलनेत मृतांची वाढलेली संख्या पाहता तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात याव्यात व त्याप्रमाणात उपचारांची व्यवस्था उभी करण्यात यावी. शेतमाल खरेदी थांबलेली आहे, कारण खरेदीसाठी पुरेशा यंत्रणा उभारण्यात आलेल्या नाहीत. पुढचा हंगाम तोंडावर असताना तूर, कापूस, हरभरा शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे शेतमाल तत्काळ खरेदी करावा आणि आगामी खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना मदत करावी”.

“सातत्याने होणार्‍या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोबल खूप मोठ्या प्रमाणात खचले आहे. सातत्याने कामावर असल्याने ते थकले सुद्धा आहेत. अनेक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले, पण त्यांना उपचार मिळत नाहीत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पोलिसांवरील हल्ले अजिबात खपवून घेता कामा नये. ते प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा लढा देत आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“लॉकडाऊन असला तरी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. विविध क्षेत्रांसाठी टास्क फोर्स तयार करून ते क्षेत्र खुले कसे करायचे. याचे प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश शासनाने द्यावेत. मुंबई महापालिकेकडून विविध शुल्क वाढविले जात आहेत. शासनाने आता ते कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने सुद्धा अर्थव्यवस्थेला चालना देणारे निर्णय घ्यावेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांना थेट त्यांच्या बँक खात्यात मदत दिली गेली पाहिजे,” अशा अनेक मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकारसमोर मांडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 7:17 pm

Web Title: coronavirus lockdown bjp devendra fadanvis attends all party meeting sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सायन रुग्णालय प्रकरण: चौकशीसाठी समिती स्थापन; दोषींवर कारवाई होणार
2 करोनाच्या मृतांचं राजकारण नको, आरोग्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
3 लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
Just Now!
X