केरळमधील टोळी अटकेत
मुंबई : गुन्हे शाखेने अटक केलेल्या टोळीने गेल्या काही महिन्यांत दोन कोटींहून अधिक किमतीच्या बनावट नोटा अर्थव्यवस्थेत आणल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दोन वर्षांपूर्वी एका दाक्षिणात्य अभिनेत्री व तिच्या आईसह केरळ पोलिसांनी या टोळीला गजाआड केले होते. तेव्हा अभिनेत्रीच्याच बंगल्यात बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याचे आढळले होते. सध्या ही टोळी नवी मुंबईत छापखाना सुरू करण्याच्या बेतात होती.
गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे पोलीस शिपाई अमित महांगडे यांच्या माहितीवरून सुमारे तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन अंधेरीत आलेल्या डॉन वर्की, विष्णू विजयन या दोन केरळच्या तरुणांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई, निरीक्षक संजीव गावडे, आशा कोरके आणि पथकाने अटक केली. लिओ जॉर्ज नावाच्या तिसऱ्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने केरळहून ताब्यात घेतले. या टोळीने केरळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बनावट नोटांचा छापखाना सुरू केला होता. तेथे दोन हजार, ५००, २०० रुपये मूल्याच्या एकूण सहा कोटी किमतीच्या बनावट नोटा छापण्यात आल्या. छपाईत कसूर राहिल्याने यातील चार कोटींच्या नोटा टोळीने जाळून नष्ट केल्या. मात्र उर्वरित दोन कोटींच्या बनावट नोटांची छपाई हुबेहूब असल्याने त्या अर्थव्यवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तिघांच्या चौकशीतून पुढे आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
केरळमधील छपाई संपवून ही टोळी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत आली होती. येताना टोळीने बनावट नोटांच्या छपाईसाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री आणली होती. यात लॅपटॉप, छपाई यंत्र, टॅब, जीएसएम पेपर, आरबीआय लिहिलेल्या तांबे-पितळीच्या पट्टय़ा, वॉटर मार्क छापलेले जीएसएम पेपर, इस्त्री, नोटांच्या आकाराचे पातळ प्लास्टिकचे तुकडे आदींचा समावेश होता.
दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या बंगल्यावर छपाई..
या टोळीला केरळ पोलिसांनी २०१८मध्ये अटक केली होती. पोलिसांनी आरोपींच्या चौकशीतून दाक्षिणात्य टीव्ही अभिनेत्री सूर्या हिच्या बंगल्यावर छापा घातला. तेथे बनावट नोटांचा छापखाना अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी सूर्या आणि तिच्या आईने टोळीला छापखान्यासाठी बंगला देऊ केला होता, अशी माहिती पुढे आली. या टोळीकडून बनावट नोटांचा मोठा साठा हस्तगत होण्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तवली आहे.
खासगी वित्तीय संस्था रडारवर
या टोळीने खासगी वित्तीय संस्था, रोख रकमेचे व्यवहार करणारे कंत्राटदार, व्यावसायिकांकरवी बनावट नोटा अर्थव्यवस्थेत आणल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. आरोपींच्या चौकशीतून सोने गहाण ठेवून कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या खासगी वित्त संस्थेचे नाव पुढे आले आहे. ही संस्था वैध नोटांच्या बंडलात टोळीने छापलेल्या बनावट नोटा मिसळून व्यवहार करत असे, अशी माहिती आरोपींनी दिली असून त्याची खातरजमा सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.
कार्यपद्धती.. : एका बाजूला छापलेल्या दोन कागदांमध्ये प्लास्टिकचा तुकडा ठेवला जाई. त्यावर गरम इस्त्री फिरवून दोन कागद एकमेकांना चिकटवले जात. वैध चलनी नोटांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या दर्जाशी मिळताजुळता कागद ही टोळी उत्तर प्रदेश येथील एका व्यापाऱ्याकडून विकत घेत होती. अशाप्रकारे प्लास्टिक, इस्त्रीच्या साहाय्याने नोटा चिकटविल्याने वॉटरमार्क हुबेहूब दिसे. या टोळीने छापलेल्या बनावट नोटांचा दर्जा उच्च प्रतीचा असून त्या सहजासहजी ओळखणे कठीण असल्याचा दावा गुन्हे शाखेकडून केला जात आहे.