ठाणे-वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर बुधवारी सकाळी रूळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली. वेल्डिंग निघाल्याने हा रूळ तुटल्याचे स्पष्ट झाले आणि सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्याबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे या तुटलेल्या रुळावरून गाडी जाताना त्या गाडीला हादरा बसला पण कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही.
तुर्भे आणि कोपरखैरणे या स्थानकांदरम्यान बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास लोकल जाताना या गाडीला अचानक हादरा बसला. मोटरमनने प्रसंगावधान दाखवत ही गाडी जागीच थांबवली. अधिक तपास केला असता या मार्गावर रूळाला तडा गेल्याचे निष्पन्न झाले. हा तडा साधासुधा नसून रूळांमधील वेल्डिंग तुटल्याने तडा पडल्याचे तपासणीत समजले. विशेष म्हणजे अशाच प्रकारचा तडा नागोठणे आणि रोहा या स्थानकांदरम्यान पडला होता आणि त्यामुळेच दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा भीषण अपघात झाल्याचा अंदाज आहे.

सिग्नल बिघाड, म. रेल्वे विलंबाने
बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळीच कल्याण आणि आसनगाव या दोन्ही स्थानकांजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. या बिघाडामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ांच्या वेळापत्रकाचा बट्टय़ाबोळ झाला. परिणामी ऐन गर्दीच्या वेळी काही गाडय़ा अनिश्चित वेळेसाठी उशिराने धावत होत्या.