डेव्हिड ससून ग्रंथालयाचा उद्या वर्धापन दिन

ज्ञानभांडाराचा ठेवा म्हणून प्रख्यात असलेल्या मुंबईतील डेव्हिड ससून ग्रंथालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांत ‘ई-ग्रंथालय’ सुरू करण्याचा विचार असल्याचे ग्रंथालयाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष हेमंत भालेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त गेल्या आठवडय़ात ग्रंथालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात नाटक, चर्चा, परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता, असे सांगून भालेकर म्हणाले की, ‘‘२१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ग्रंथालयाच्या वास्तूत असलेल्या उद्यानात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथालयाचे संस्थापक डेव्हिड ससून आणि ग्रंथालयावर अरविंद दवे यांनी तयार केलेली एक ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात येणार आहे. तसेच वाद्यवृंद सादरीकरण, बासरीवादन आदी कार्यक्रम यावेळी पार पडणार आहेत. या कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ व अर्थतज्ज्ञ इक्बाल छागला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘ई-ग्रंथालय’ सुरू करण्याचा आमचा विचार आहे. तसेच ग्रंथालयाची दुरुस्ती व सुधारणा केली जाणार आहे. ग्रंथालयातील सर्व पुस्तकांची यादी ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ग्रंथालयाच्या वास्तूची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी काळा घोडा संघटनेतर्फे ग्रंथालयाला २८ लाख रुपयांची देणगी देण्यात आली असल्याचेही भालेकर म्हणाले. ग्रंथालयाच्या वास्तूत खास उद्यान तयार करण्यात आले असून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचेही भालेकर यांनी सांगितले.

दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे ग्रंथालयाच्या ‘फेसबुक’ पानावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ससून ग्रंथालय तीन हजार सभासद   

  • २ हजार ५०० आजीव सभासद
  • ७० हजारांहून अधिक पुस्तके
  • वेळ सकाळी ८ ते रात्री ९