मुंबईतील एका दिवसातील रुग्णसंख्या मंगळवारी अचानक घटली. गेल्या दीड महिन्यानंतर प्रथमच कमी संख्येने रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी १,०९० रुग्णांची नोंद झाली, तर १,४७० रुग्ण बरे होऊन घरी गेले.

गेला दीड महिना रुग्णसंख्येत सतत वाढ होत होती, मात्र गेल्या आठवडय़ापासून ही संख्या कमी कमी होऊ लागली आहे. मंगळवारी दिवसभरातील रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून १,१४६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण बाधितांची संख्या २,४४,२६२ वर गेली आहे, त्यापैकी २,१४,३७५ रुग्ण म्हणजेच ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १८,४४४ रुग्ण उपचाराधीन आहेत. सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण बोरिवलीत २,२६८ इतके आहेत. ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी ८९८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख २ हजार ६३३ इतकी झाली आहे, तर दिवसभरात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

देशात ६७ लाख करोनामुक्त

* देशात आत्तापर्यंत ६७ लाख रुग्ण करोनामुक्त झाले असून ही आकडेवारी जगभरात सर्वाधिक आहे.

* करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८८.६० टक्क्यांवर पोहोचले.

* ९.६ कोटी नमुना चाचण्या घेतल्या असून प्रतिदिन १० लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत.

* जगभरात सर्वाधिक नमुना चाचणी करणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

* संसर्गदर ७.९० टक्के असून गेल्या आठवडाभरात तो ६ टक्के होता, तर गेल्या चोवीस तासांमध्ये तो ४.५ टक्के होता.

* गेल्या ७ दिवसांमध्ये १० लाखांमागे देशात ३१० रुग्णांना करोनाची बाधा झाली, जगभरातील सरासरी ३१५ आहे.

* स्पेन, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे.

* १० लाखांमागे भारतात ८३, तर जगभरात सरासरी १४२ मृत्यू झाले.

* देशात मृत्युदर सप्टेंबर सुरुवातीला १.७७ टक्के होता, आता १.५२ टक्के आहे.

लसीकरण..

* लशींचे वितरण-वाटपासंदर्भातील तज्ज्ञांनी प्राधान्यक्रम ठरवणारा मसुदा तयार केला आहे. लशींवरील संशोधन यशस्वी झाले तर जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये लशींचे डोस कसे दिले जातील, कोणाला दिले जातील याचा आराखडा करण्यात आला आहे.

* लसीकरणासाठी डिजिटल ओळखपत्राची सक्ती केली जाणार नाही. लोकांकडे अनेक ओळखपत्रे असतात. निवडणुकीत मतदानावेळी ती दाखवली जातात, त्याप्रमाणे लसीकरणासाठी ती वापरता येतील.

* देशात लस साठवणुकीसाठी २८ हजार शीतकोठारे आहेत.

६ राज्यांत ६४ टक्के रुग्ण

* ६ राज्यांमध्ये ६४ टक्के उपचाराधीन रुग्ण असून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या तीन राज्यांमध्ये ४९.८९ टक्के रुग्ण आहेत, तर पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या तीन राज्यांमध्ये १४ टक्के रुग्ण आहेत.

* महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, अहमदनगर या जिल्ह्य़ांमध्ये सर्वाधिक उपाचाराधीन रुग्ण आहेत.