शहर आणि उपनगरातील कमाल आणि किमान दोन्ही तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान एकाच दिवसात चार अंशांनी उतरले.

गेला आठवडाभर कमाल तापमान हे चढेच राहिले. बुधवारी मात्र त्यामध्ये एकाच दिवसात चार अंशाची घट झाली. त्यामुळे दिवसा जाणवणारा उकाडा कमी झाला. कुलाबा केंद्रावर ३०.५ अंश आणि सांताक्र ूझ ३१.७ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी चार अंश तापमान घटले. बुधवारी किमान तापमानात घट झाली असून, दोन्ही केंद्रावर ते २० अंशांखाली नोंदविण्यात आले. कुलाबा येथे १९.५ अंश आणि सांताक्रूझ येथे १६.६ अंश किमान तापमान राहिले.

राज्यात सर्वदूर गारवा

कोरडे हवामान, निरभ्र आकाशाची स्थिती आणि उत्तरेकडील राज्यांतून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सर्वदूर रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली गेल्याने गारवा कायम आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत मध्य भारतासह महाराष्ट्रातही किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकण विभागात रत्नागिरी, अलिबाग आदी भागांतील तापमानात सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी घट झाल्याने या भागांत गारवा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, नाशिकचा पारा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून १० अंशांच्या खाली आहे. बुधवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ात औरंगाबाद, नांदेड आणि बीडमध्येही तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. विदर्भातही सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली आहे.