गेल्या काही आठवडय़ांपासून देशभरातील करोनाबाधितांच्या घटत्या संख्येने दिलासा दिला असतानाच मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांतही करोनाचा फैलाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही शहरांत दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण वाढत असताना त्यातून निदान होणाऱ्या बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. मुंबईत बाधितांचे प्रमाण १४ टक्के, तर ठाण्यात ते जेमतेम चार टक्क्यांवर आहे.

शीघ्र प्रतिजन चाचणीचा पर्याय उपलब्ध झाल्यापासून सर्वत्र चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, चाचण्यांचे प्रमाण वाढत असताना त्यातून बाधितांचे निदान होण्याचे प्रमाण कमी होत चालल्याचे आशादायी चित्र आहे. मुंबई महापालिकेने दररोज १६ ते २० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. त्यातून एकूण ४७ हजार ७४८ रुग्णांचे निदान झाले. हे प्रमाण १३.५३ टक्के इतके आहे. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण १७ टक्क्यांवर होते.

ठाण्यातही करोनाचा प्रसार कमी झाल्याचे चित्र आहे. शहरात दररोज सरासरी पाच ते साडेपाच हजार चाचण्या केल्या जातात. त्या तुलनेत दररोज आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या  दीडशे ते दोनशे इतकी आहे. हे प्रमाण साधारण चार टक्क्यांच्या आसपास आहे. गेल्या महिन्यात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आसपास होते.