मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानांवरून अस्थिरतेचा संदेश;विरोधकांची टीका

‘किती दिवस मुख्यमंत्रिपदी असेन याची मला पर्वा नाही, पण पदावर असेन तेवढे दिवस परिवर्तनासाठी झटत राहीन’ किंवा ‘मराठा मोर्चाच्या माध्यमातून मला हटविण्याचे प्रयत्न झाले तरी समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत,’ अशा प्रकारच्या विधानांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अप्रत्यक्षपणे हतबलताच दिसून येते. दुसरीकडे अशा विधानांच्या माध्यमातून मराठेतर मतांच्या ध्रुवीकरणास मदत होऊ शकते, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे.

किती दिवस मुख्यमंत्रिपदी असेन याची पर्वा नाही, अशा आशयाचे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात केले. मराठा समाजाला आरक्षण देणारच, असा निर्वाळाही त्यांनी दिला. याआधी मराठा समाजाच्या मोर्चाच्या माध्यमातून मला हटविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याबाबतचे विधानही त्यांनी केले. मराठा समाजाचे मोर्चे आणि मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते, असाच सूर राजकीय वर्तुळात आहे.  संकटे आली तरीही त्यांना ठामपणे सामोरे जाणे यातच राजकीय नेतृत्वाची कसोटी असते. पण मला पदावरून हटविणे किंवा किती दिवस मुख्यमंत्रिपदावर राहीन, अशी विधाने केल्याने मुख्यमंत्रीच अस्थिर आहेत, असा संदेश गेला आहे.

प्रस्थापित जातींना बाजूला ठेवून सत्तेची सूत्रे अन्य समाजांकडे देण्याचे भाजपचे धोरण आहे. महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल किंवा हरयाणामध्ये जाट वा झारखंडमध्ये बिगर आदिवासींकडे भाजपने नेतृत्व सोपविले. यातून सत्तेतून दूर फेकल्या गेलेल्या पटेल किंवा जाट समाजाच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. राज्यात मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघण्यामागे अन्य कारणांबरोबरच सत्तेतून दूर गेलो याचेही शल्य आहे. भाजपने राज्यात ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) हा प्रयोग मागे केला होता.

मराठा समाजाच्या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर इतर मागासवर्गीय, दलित व अन्य जातींची मोट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मराठा मोर्चाच्या माध्यमातून मला पदावरून हटविण्याचा डाव आहे, अशी चर्चा सुरू करून मराठेतर समाजांचे ध्रुवीकरण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असू शकतो. प्रस्थापित जातींना दूर ठेवून अन्य समाजाला एकत्र करण्याचे भाजपचे राष्ट्रीय पातळीवरच धोरण आहे.

मुख्यमंत्री अस्थिर – विखे-पाटील

मला पदावरून हटविण्याचा प्रयत्न किंवा किती दिवस मुख्यमंत्रिपदावर राहीन अशी विधाने करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे पद अस्थिर असल्याचा संदेश दिला आहे. पण मुख्यमंत्री बदलणे हा भाजपचा अंतर्गत मामला आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर व्यक्त केली. मराठा विरुद्ध दलित हा वाद निर्माण करण्याचा चुकीचा प्रयत्न काही मंडळींनी सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पुन्हा आरक्षणाचे गाजर

पृथ्वीराज चव्हाण सरकारने घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयात टिकला नाही. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला खूश करण्यासाठी घाईघाईत तो निर्णय घेण्यात आला होता. न्यायालयाने आरक्षण रद्दबातल ठरविल्यावर भाजप सरकारने आरक्षणासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले, पण या प्रश्नात सरकार तेवढे गंभीर नव्हते. मराठा मोर्चाची धग वाढल्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखविले आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायचे झाल्यास आरक्षणाचा टक्का वाढेल. कोणत्याही सरकारसाठी हा किचकट मुद्दा ठरणार आहे.