महाविकासआघाडी सरकारमधील कॅबिनेटमंत्री यांच्या समोर अडचणी काही संपताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच गाजलेले बलात्काराच्या आरोपांचे प्रकरण शमते ना शमते तोच आता त्यांच्या समोर आणखी एक नवीन संकट उभा ठाकल्याचं दिसत आहे. कारण, त्यांची दुसरी पत्नी करूणा यांनी त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात मागील तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे, असा आरोप करूणा यांनी केला आहे. तर, दोन मुलांपैकी एक १४ वर्षांची मुलगी असून ती सुरक्षित नाही, असं देखील करूणा यांचं म्हणणं आहे. एवढच नाही तर पोलिसांनी या प्रकरणी सहकार्य न केल्यास २० फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.

करुणा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्या दोन मुलांना जबरदस्ती आपल्या बंगल्यात मागील तीन महिन्यांपासून बंद करून ठेवले आहे आणि मला त्यांना भेटू दिले जात नाही. मला त्यांच्याशी फोनवर देखील बोलू दिले जात नाही. जेव्हा मी २४ जानेवारी २०२१ रोजी मुलांना भेटण्यासाठी चित्रकुट बंगल्यावर गेले, तेव्हा धनंजय मुंडे यांनी पोलिसांना बोलावले व मला मुलांनी भेटू दिले नाही. तरी धनंजय मुंडे यांना विधानसभेतून तत्काळ निलंबीत केलं जावं आणि भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्यासाठी त्यांना अयोग्य घोषित केलं जावं. धनंजय मुंडे यांच्या चित्रकुट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. माझी लहान मुलगी असून ती १४ वर्षांची आहे व बंगल्यावर कुणी महिला केअरटेकर देखील नाही. धनंजय मुंडे यांची वागणूक चांगली नाही. दोन्ही मुलांना माझ्या विरोधात भडकवलं जात आहे. यामुळे मुलांबरोबर काही वाईट घडलं तर, त्यासाठी धनंजय मुंडे जबाबदार असतील. मला माझ्या मुलांना भेटू द्यावं. अन्यथा मी २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसेल.”