केंद्रीय पातळीवरील सीईटी जाहीर झाल्यापासून कोटा येथील क्लासेसच्या नावाने आता लातूर, मराठवाडय़ातही शिक्षणाची दुकाने उघडू लागली आहेत. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनी क्लासचा रस्ता पकडू नये, यासाठी लातूर, नांदेड, अकोला येथील महाविद्यालयांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षांना राज्यातून सर्वाधिक विद्यार्थी कुठून बसतात याचा पद्धतशीर अभ्यास करून त्या त्या भागात क्लासचालक आपली दुकाने मांडत आहेत. मोशन, रेझोनन्स, दिशा, दीक्षा या नावाने उघडलेल्या या दुकानांमध्ये या वर्षीपासून अकरावी-बारावीबरोबरच नीट, जेईई-मेन्स, जेईई-अ‍ॅडव्हान्स अशा परीक्षांचे ज्ञान अक्षरश: विकले जात आहे. मुंबईत आलेले टायअपचे लोण महाराष्ट्राच्या अन्य भागांत हळूहळू पसरू लागले आहे, मात्र जादाचे वर्ग, शिकवण्या, प्रश्नपत्रिकांचा सराव, शंकासमाधान अशा मार्गानी ग्रामीण भागातील महाविद्यालये या स्पर्धेत टिकाव धरून आहेत.
ग्रामीण भागातील गरीब व निम्न मध्यमवर्गीय घरातील विद्यार्थ्यांचे डॉक्टरकी वा इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण करण्यात या महाविद्यालयांनी मोठी भूमिका निभावली आहे. कोल्हापूरचे शाहू, नांदेडचे यशवंत महाविद्यालय म्हटले की विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येऊन धडकत असे. पण आता महाविद्यालयांच्या या प्रयत्नांची हेटाळणी ‘जनता क्लासेस’ म्हणून केली जाते. या हेटाळणीला गुणवत्तेनेच उत्तर द्यायचा महाविद्यालयांचा प्रयत्न आहे. पण बाहेरून आणलेले शिक्षक टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान या महाविद्यालयांसमोर आहे.
 कोटा, हैदराबादच्या शिक्षकांना घेण्यास क्लासचालकही इच्छुक असतात. त्यामुळे त्यांचा भाव एकदम वधारला आहे. क्लासचालक वारेमाप शुल्क आकारून त्यांचा खर्च पालकांच्या खिशातून वसूल करू शकतात. पण महाविद्यालयांना भरमसाट शुल्क आकारता येत नाही. त्यामुळे या महाविद्यालयांत शिक्षकांची टंचाई जाणवत आहे.
‘आम्ही सहा शिक्षक हैदराबादहून आणले, पण त्यापैकी काही परत गेल्याने आम्हाला सतत नव्या शिक्षकांच्या शोधात राहावे लागते,’ असे शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. जाधव सांगतात.