डोंबिवली येथील मेट्रोपॉलीटन कंपनीला लागलेल्या आगीला सात तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तरीही ही आग अजून पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. डोंबिवली एमआयडीसी परिसरात धूर पसरला आहे. मेट्रोपॉलीटीन ही केमिकल कंपनी आहे. या कंपनीतील आग नियंत्रणात आणणे हे अग्निशमन दलापुढचे आव्हान आहे. गेल्या सात तासांपासून अग्निशमन दलाचे जवान ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. केमिकल कंपनी असल्याने ही आग नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागतो आहे. फोम आणि पाणी यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मेट्रोपॉलीटन कंपनीला आग लागली. या आगीमुळे  दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि त्यानंतर पसरत गेली. या आगीमुळे एमआयडीसी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही वेळापूर्वीच या कंपनीत स्फोटाचे दोन आवाज आले आणि आगीचा आणखी भडका उडाला. त्यानंतर अग्निशमन दलाचे १० बंब आले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

छायाचित्र-दीपक जोशी

एमआयडीसी येथील फेज २ मध्ये ही आग लागली. आग नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. उशिरापर्यंत ज्वाळा दिसत होत्या. तसेच ट्रेनमधून दिवा आणि कोपर स्टेशनमधूनही या आगीची दृश्यं दिसत होती.

छायाचित्र-दीपक जोशी

 

पाहा व्हिडीओ

डोंबिवली एमआयडीसीमध्ये आग लागल्यानंतर माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तसंच ओमकार इंटरनॅशनल, मॉडेल स्कूल या शाळा लवकर सोडून देण्यात आल्या. उद्याही अनेक कंपन्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

या कंपनीत असलेल्या केमिकलच्या काही ड्रम्सचा स्फोट झाला त्याचे हादरे एमआयडीसी निवासी विभागात असलेल्या काही इमारतींनाही बसले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून कसोशीचे प्रयत्न केले जात आहेत. या आगीमुळे धुराचे लोट एमआयडीसी परिसरात पसरले. अनेकांना श्वसनासही त्रास होऊ लागला. आता बरीचशी आग नियंत्रणात आली आहे. मात्र तरीही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात यावी म्हणून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.