मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी प्रथमच तब्बल १०२ दिवसांवर गेला आहे. ऑगस्टमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ दिवसांवर गेला होता, मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली. दरम्यान, बुधवारी १,६०९ रुग्णांची नोंद झाली असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

करोनाच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस जेवढे अधिक तेवढे चांगले मानले जाते. याचाच अर्थ सांख्यिकी गणनेनुसार मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्यास सध्या १०२ दिवसांचा कालावधी लागतो आहे.

मुंबईतील २४ पैकी ३ विभागांत रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक आहे, तर या व्यतिरिक्त ११ विभागांमध्ये हा कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. वरळी, प्रभादेवीमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा सर्वाधिक असून तो १७५ दिवस इतका आहे. तर या खालोखाल भायखळ्यामध्ये १६० दिवस, आणि परळ – शिवडीमध्ये १५७ दिवस इतका आहे.

दरम्यान, मुंबईत बुधवारी ८९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १९,२४५ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर आतापर्यंत ९८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात १ हजार २१ रुग्ण

ठाणे जिल्ह्यात बुधवारी १ हजार २१ करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ३ हजार ६५४ वर पोहोचली आहे. दिवसभरात २३ जणांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार १५८ इतकी झाली आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत ठाणे शहरातील २५९, नवी मुंबई २५३, कल्याण-डोंबिवली २२१, मीरा-भाईंदर १३२, ठाणे ग्रामीण ४२, बदलापूर शहर ३३, उल्हासनगर शहर ३१, भिवंडी शहर २६ आणि अंबरनाथमधील २४ रुग्णांचा समावेश आहे.

तारीख रुग्ण दुपटीचा       कालावधी

२२ मार्च    ३ दिवस

१५ एप्रिल   ५ दिवस

१२ मे १० दिवस

२ जून  २० दिवस

१० जुलै    ५० दिवस

२५ ऑगस्ट  ९३ दिवस

१४ सप्टेंबर  ५४ दिवस

१ ऑक्टोबर ६६ दिवस

२१ ऑक्टोबर १०२ दिवस