मुंबई पोलीस दलाची सध्या स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाच्या वेळेतली अनियमितता, त्यातून घर-कुटुंबासह स्वत:कडे होणारे दुर्लक्ष, व्यसनाधीनता, वरिष्ठांचे रुसवे-फुगवे, सतत कारवाईची टांगती तलवार या दुष्टचक्रात गुरफटलेला पोलीस शरीरानेच नव्हे तर मनानेही खंगला होता. नोकरी म्हणजे गुलामगिरी ही त्याची मानसिकता होती. पण आठ तासच काम करण्याचे जाहीर झाल्यानंतर ही मानसिकता बदलली आहे. या उपक्रमामुळे पोलीस आनंदी, समाधानी दिसतात. छोटय़ाशा बदलामुळे नव्या दमाने, उत्साहाने नेमून दिलेले कर्तव्य अचूकपणे पार पाडण्यासाठी धडपडताना दिसतात.

दीड वर्षांपूर्वी देवनार पोलीस ठाण्यात सुरू झालेला या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी तो संपूर्ण शहरात राबवण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसांत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) ते शिपाई हा वर्ग तीन पाळ्यांमध्ये काम करेल.

हा वर्ग पोलीस दलाचा कणा मानला जातो. कोणतीही घटना घडली की सर्वात आधी प्रतिसाद देणारा, सण-उत्सवांसह निवडणुका आणि अन्य कारणास्तव बंदोबस्तासाठी तासन्तास उभा राहणारा, गुन्हा घडू नये यासाठी गस्त घालणारा, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी राबणारा, गुन्हे नोंदवून घेणारा, प्रशासकीय काम हाताळणारा हाच वर्ग आहे. आकडे पाहिल्यास शहरातील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये एएसआय ते शिपाई या पदांवर सुमारे १५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या पदांवरील अधिकाऱ्यांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. पूर्वी १२ तासांच्या दोन पाळ्यांमध्ये पोलीस ठाणे कार्यरत होते. सकाळी आठ वाजता कामाला रुजू झालेला पोलीस रात्री आठच्या ठोक्याला काम आटोपून मोकळा झालेला कधीच दिसला नाही. कामाच्या स्वरूपामुळे तो रात्री १०, १२ किंवा मध्यरात्री दोनला मोकळा होतो. १६ तासांनी त्याची सुटका होते. पोलीस ठाण्याजवळ घर असलेल्यांपेक्षा अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, पनवेल, विरार येथून म्हणजेच लांबून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सकाळी डय़ुटीवर रुजू होण्यासाठी पहाटे सहा वाजता घर सोडलेला पोलीस अनेकदा पहाटे चार वाजता घरी येतो. दोन तास झोपून पुन्हा कामाला निघण्याची तयारी सुरू करतो. झोप, जेवणासह सर्वच दिनक्रम अनेक वर्षांपासून विस्कळीत झाल्याने आपसूक होणारे आजार हळूहळू पोलिसांच्या जीवावर बेतू लागले. कामाच्या स्वरूपामुळे संशयी वृत्ती, तर्क लावून वागण्याची सवय, चिडचिड, घुसमट पोलीस आपल्या घरात विविध ढंगाने व्यक्त करतो. यामुळे त्याची दहशत घरात निर्माण होते आणि तो कुटुंबापासून तुटतो. घरातले वातावरण कोंदट बनते. त्याचा सर्वाधिक परिणाम पोलीस घरातल्या मुलांवर होतो. कोणत्याही प्रसंगात पोलीस आपल्या मुलांसोबत नसतो. नोकरीमुळे सण-उत्सवांसह घरपरिवारात शुभ कार्य असोत किंवा दु:खाचे प्रसंग, पोलिसाला त्यात सहभागी होता येत नाही. गावी, आई अखेरच्या घटका मोजत होती. ती गेली तेव्हाच मला अंत्यविधीसाठी सुट्टी मिळाली. थोडय़ाफार फरकाने हा अनुभव प्रत्येक पोलीस अनुभवतो. संघटना नसल्याने कामावर होणारा अन्याय, अत्याचार सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही. या पाश्र्वभूमीवर पोलिसांमधली व्यसनाधीनता, कामचुकारपणा, भ्रष्टाचार, हिंसक  वृत्ती वाढते.

ही परिस्थिती बदलावी, आपले सहकारी कार्यतत्पर व्हावेत, त्यांच्यात उत्साह संचारावा, त्यांच्या घरात स्वच्छंदी वातावरण निर्माण व्हावे, ही तळमळ उराशी बाळगलेल्या देवनार पोलीस ठाण्यातील शिपाई रवींद्र पाटील यांनी उपलब्ध मनुष्यबळात आठ तासांच्या तीन पाळ्यांमधील कामाची व्यूहरचना तयार केली. ती पोलीस आयुक्त पडसलगीकर यांना पटली, व्यवहार्यही वाटली. त्यांनी पुढाकार घेतला. पदाने शेवटच्या टोकावर असलेल्या पडसलगीकर यांनी पाटीलचे कौतुक केले, त्याच्याच पोलीस ठाण्यात हा प्रयोग सुरू करण्याची जबाबदारीही सोपवली. देवनार पोलीस ठाण्यातील सर्व सहकाऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी ठरवला. प्रयोगाचा परिघ वाढला आणि तो यशस्वी ठरू लागल्याने तीन पाळ्यांमध्ये काम सुरू करा, असे आदेश वरिष्ठांकडून सुटू लागले.

काम आठ तासांवर आले. आता पोलीस जास्तीत जास्त वेळ कुटुंबाच्या सहवासात आहे. मुलांना शाळेत सोडण्या-आणण्यापासून, शालेय प्रगती, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतो आहे. वेळेत जेवण, पुरेशा झोपेसोबत तो स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतो आहे. पीळदार शरीर कमावण्यासाठी मेहनत करणाऱ्या पोलिसांनी नोकरीतल्या अनियमिततेमुळे व्यायामशाळा सोडल्या होत्या. आठ तासांची पाळी सुरू झाल्यानंतर अनेक पोलीस पुन्हा व्यायामशाळेत घाम गाळू लागले. त्यासोबत गायन, वाद्यवृंद, वाचन, लिखाण, काव्य, जादूचे प्रयोग, नक्कल, खेळ असे विविध छंद फावल्या वेळेत जोपासू लागले. दुसरीकडे त्यांच्यातली कामचुकार वृत्ती कमी होऊन कार्यतत्परता वाढली. आठ तासांमध्ये जास्तीत जास्त आणि उपयुक्त काम करण्यावर पोलीस भर देऊ लागले. वेळेआधी पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे प्रमाण वाढले तर परस्पर रजा घेण्याचे प्रमाण घटले. यासोबत व्यसनाधीनता हळूहळू कमी होत आहे. पूर्वी नेमून दिलेलेच काम करणार, ती माझी जबाबदारी नाही, अशा तक्रारी जास्त होत्या. आता अनेक पोलीस कर्मचारी संगणक, वाहन चालवणे, वायरलेस संच हाताळणी अशा विविध कामांमध्ये रस घेत आहेत. हे सकारात्मक बदल तीन पाळयांमध्ये काम सुरू असलेल्या पोलीस ठाण्यांमधून आयुक्त पडसलगीकर यांनी घेतलेल्या आढाव्यातून पुढे आल्या आहेत. योग्य नियोजनामुळे पोलीस ठाण्याच्या प्रत्येक विभागाला जास्त मनुष्यबळ उपलब्ध होते आहे.

भविष्यात गुन्हे शाखा, विशेष शाखेसह अन्य विभागांमध्येही तीन पाळ्या सुरू करण्याचा विचार सुरू आहे. या कार्यपद्धत महत्त्वाचे शिलेदार असलेल्या पाटील यांना राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून आमच्या इथे कधी सुरू होणार तीन शिफ्ट, अशी विचारणा करणारे फोन रोजच्या रोज येतात. हा प्रयोग संपूर्ण राज्यात सुरू व्हावा, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. पगार वाढावा ही मागणी कायम राहील, कारण महिन्याच्या अखेरीस पैशांचा हिशोब करावाच लागतो. पण कामाचा ताण हलका झाला, आम्ही वेळेत घरी जाऊ लागलो, दोन घास कुटुंबासोबत, मुलाबाळांसोबत जेवू लागलो, हे खूप आहे. आजोबा, वडील आणि आता मी पोलीस दलात आहे. २० वर्षे झाली. कधीच कोणत्या सुख, दु:खाच्या प्रसंगात मी कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत नव्हतो. बहुतांश आनंदी प्रसंगांच्या छायाचित्रांत मी नव्हतो. आता अशा छायाचित्रांमध्ये मीही दिसू लागलोय. मुलांसोबत संवादाची दरी हळूहळू कमी होतेय. सध्या याचे खूप अप्रूप वाटते आहे. कर्तव्याची जाणीव आधीही होती. त्या त्या वेळेला जीवाचे रान करून, कुटुंब वाऱ्यावर सोडून कर्तव्य बजावलेले आहे. आता त्याहून चांगले करण्याची ऊर्मी निर्माण झाली आहे, ही एका पोलीस शिपायाची बोलकी प्रतिक्रिया. थोडय़ा फार फरकाने अशाच प्रतिक्रिया आठ तास काम करणारे पोलीस व्यक्त करतात.

जयेश शिरसाट jayesh.shirsat@expressindia.com