पक्षात बाजूला फेकले गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘माझी अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी’ असे सांगत अडवाणींबरोबर तुलना करण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपमधील बदलांमध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही हे लक्षात येताच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी कधीच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नाही, उलट मौनच बाळगणे पसंत केले. याउलट राज्याचे नेतृत्व करण्याची संधी डावलण्यात आल्यावर एकनाथ खडसे यांनी वारंवार नेतृत्वावर शरसंधान केले. जमीन घोटाळ्याचे प्रकरण समोर येताच भाजप नेतृत्वाने खडसे यांना थेट घरचा रस्ता दाखविला.
मंत्रिपद जाऊन वर्ष उलटले तरी राजकीय पुनर्वसनाची संधी दिसत नसल्याने खडसे अस्वस्थ आहेत. चौकशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर झाला असला तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असला तरी न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. या साऱ्या पाश्र्वभूमीवर खडसे यांचे लगेचच राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खडसेंबद्दल असलेली अढी अद्यापही दूर झालेली नाही. त्यातून खडसे यांचे मंत्रिमंडळ परतीचे दोर कापले गेल्याचे मानले जाते. वर्षभरात पक्षाकडून काहीच मदत झालेली नसल्याने खडसे यांना राजकीय भवितव्य धूसर दिसू लागले आहे. खडसे यांच्या जळगाव या प्रभाव क्षेत्रात पक्षाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ताकद देऊन नाथाभाऊ खडसे यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले आहे. महाजन यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताकद दिल्याचे मानले जाते.
याउलट खडसे यांचे उदाहरण देता येईल. मुख्यमंत्रिपद नाकारण्यात आल्याने खडसे यांची चिडचिड वारंवार अनुभवास मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुरघोडय़ा करण्याची संधी सोडली नाही. जाहीरपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका मांडली. नेतृत्व करण्याची संधी जातीमुळे डावलली गेली, असाही सूर लावला. पुण्यातील जमिनीचे प्रकरण बाहेर येताच मुख्यमंत्र्यांनी खुबीने खडसे यांची विकेट काढली. खडसे यांच्या जमीन घोटाळ्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसतो हे दिल्लीला पटवून देण्यात फडणवीस यशस्वी झाले. पक्षाने खडसे यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. तेव्हापासून खडसे राजकीय विजनवासात गेले आहेत. पक्षासाठी वर्षांनुवर्षे खस्ता खाल्ल्या, पण आपल्या अडचणीच्या काळात कोणीच मदतीला आलेले नाही याची खंत खडसे यांना आहे. त्यातूनच त्यांनी स्वत:ची अडवाणी यांच्याबरोबर तुलना केली आहे. जैन हवाला डायरीत नाव आल्यावर अडवाणी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पुढे चौकशीत काहीच आढळले नाही आणि अडवाणी यांच्याकडे सूत्रे आली होती.
सध्या बाबरी मशीद प्रकरणात अडवाणी यांना खटल्याला सामोरे जावे लागत आहे. खडसे यांना जमीन घोटाळाप्रकरणी कायदेशीर सामना करावा लागत आहे.
- लालकृष्ण अडवाणी यांच्या पाकिस्तान दौऱ्यापासून त्यांच्याबद्दल रा. स्व. संघाची भूमिका बदलली. कारण कराची दौऱ्यात अडवाणी यांनी महंमद अली जीना यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती.
- २००९ च्या पराभवानंतर विरोधी पक्षनेतेपदही सुषमा स्वराज्य यांच्याकडे सोपविण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपले नाव पुढे केले तेव्हा अडवाणी यांनी पडद्याआडून विरोध केला होता. तेव्हा अडवाणी यांच्या निवासस्थानासमोर पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली होती.
- नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी झालेली निवड किंवा ज्येष्ठ नेत्यांचा मार्गदर्शक मंडळात समावेश करून त्यांना कोणतेही पद मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावरही अडवाणी यांनी काहीही मतप्रदर्शन केले नव्हते. ‘देशात पुन्हा आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे विधान करून अडवाणी यांनी मध्यंतरी वादळ निर्माण केले होते. एखाददुसरा अपवाद वगळता अडवाणी यांनी मौन बाळगणे पसंत केले.