मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA नं गुरुवारी सकाळीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. याच संदर्भात एनआयएनं (National Investigation Agency) प्रदीप शर्मा यांच्या घरावर सकाळीच छापा टाकला होता. तेव्हापासूच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलं आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. ही कार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात एनआयएनं सविस्तर तपास केल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यामध्ये सचिन वाझे यांच्यासह मुंबई पोलिसातील दोन कर्मचारी आणि एक बुकी यांचा हात असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानुसार त्यांना एनआयएनं अटक केली. त्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात झालेली ही मोठी कारवाई ठरली आहे.

हिरेन, वाझे आणि आता प्रदीप शर्मा…. समजून घ्या अँटिलिया प्रकरण आहे तरी काय?

याआधीही प्रदीप शर्मांची प्रदीर्घ चौकशी, पण अटक नाही!

प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएनं सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ७ आणि ८ एप्रिल रोजी एनआयएनं प्रदीप शर्मा यांची दीर्घकाळ चौकशी केली. यावेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी सचिन वाझे यांना देखील त्यांच्यासमोर आणून चौकशी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, यावेळी प्रदीप शर्मा यांच्या अटकेची शक्यता वर्तवली गेली असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. पण गुरुवारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर दुपारी एनआयएनं त्यांना अखेर अटक केली आहे.

 

२८ जूनपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची २८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्रदीप शर्मा यांच्यासोबतच इतरही दोन आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Encounter specialist pradeep sharma arrested by nia in mansukh hiren murder case pmw
First published on: 17-06-2021 at 14:10 IST