शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षांत के लेल्या घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालय, अतिविशेष रुग्णालय, अद्ययावत १४ बस तळ, आदिवासी महिला चालकांची नेमणूक या घोषणांचा विसरच पडलेला आहे.

२३ जानेवारी २०१६ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई सेन्ट्रल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांची अंमलबजवणी झाली नाही.

२० जानेवारी २०१८ मध्ये मुंबई सेन्ट्रल येथील एसटी मुख्यालय परिसरात झालेल्या कायक्रमातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा रावते यांनी के ली होती. यात वीर सैनिकांच्या पत्नीला मोफत एसटी प्रवासाच्या घोषणेची अंमलबजावणी झाली. मात्र आदिवासी महिलांची एसटीत चालक म्हणून नेमणूक करण्याची घोषणा केल्यानंतर ती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

एसटी महामंडळाकडून पुण्यातील सांगवी येथे एसटीच्या जागेतच अतिविशेष अद्ययावत रुग्णालय उभारले जाणार होते. स्वखर्चातून रुग्णालय उभारतानाच तीन वर्षांत ते बांधण्याचे उद्दिष्ट होते. पण त्यावर आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. अतिविशेष रुग्णालयातून मिळणाऱ्या उत्पन्नातूून नवी मुंबईत मोटर वाहन अभियांत्रिकी महाविद्यालही उभारले जाणार होते. परंतु हे महाविद्यालही उभे राहिलेले नाही.

योजना काय

* राज्यातील बस आगार, स्थानकांच्या दुर्दशेमुळे काही महत्त्वाच्या आगार, बस स्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेण्यात आला.

* एसटी महामंडळाने त्यासाठी राज्यातील पनवेल, औरंगाबाद (सिडको), पुणे, नाशिक महामार्ग, बोरिवली नॅन्सी कॉलनी, नागपूर, सांगली, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेडसह अन्य तीन ठिकाणांची निवड केली. वारंवार निविदाही काढण्यात आल्या.

* निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने काही अटी व शर्तीमध्ये बदल केल्यानंतर फक्त पनवेल बस स्थानक, औरंगाबादमधील बस तळाच्या कामांनाच प्रतिसाद मिळाला.

* चार वर्षांपूर्वी पनवेल येथील कामासाठी, तर औरंगाबादमधील कामासाठी दोन वर्षांपूर्वी निविदा काढण्यात आली. परंतु दोघांचेही काम सुरू झालेले नाही.

एसटी महामंडळाचा अभियांत्रिकी महाविद्यालय, अतिविशेष रुग्णालयाच्या प्रस्तावाचा सध्या तरी विचार नाही. तर अद्ययावत अशा १४ बस तळांपैकी दोनच बस तळांसाठी निविदा काढलेली आहे. याशिवाय चालक प्रशिक्षण प्रक्रिया सध्या थांबलेली आहे. ती लवकरच सुरू होऊन एसटीत महिलाचालक काही महिन्यांनी सेवेत येतील.

– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ