भाजपा आणि शिवसेनेचं सरकार याआधी राज्यात होतं. त्यावेळी आमच्यातही खटके उडत नव्हते का? खटके उडतच होते. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आमच्यात खटके उडत नाहीत. खटका हा शब्द प्रसारमाध्यमांनी दिलाय. तीन पक्षांपैकी एकाही पक्षाने खटका हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे हा खटका हा शब्द मीडियाने मनातून काढून टाकावा असाही सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्यात चांगल्या प्रकारे समन्वय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आणखी वाचा- “अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले असं नाही…;” त्या प्रकरणावर संजय राऊताचं उत्तर

या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांनाही उत्तरं दिली. पारनेरमध्ये जे नगरसेवक फुटले ते अजित पवारांनी फोडले असं म्हणता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच यापुढे असा काही मुद्दा असेल तर आपसात चर्चा करावी. हा मुद्दा अत्यंत स्थानिक पातळीवरचा होता. यावरुन मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना कोणताही फोन केलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकास आघाडीच्या डिक्शनरीत नाहीत, राऊतांचं फडणवीसांना उत्तर

पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार

महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल हा विश्वास शरद पवारांनीच व्यक्त केला आहे, असे राऊत म्हणाले. मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन कोणी राजकारण करु नये. बदल्यांचा विषय मोठा नाहीय. हा विषय आमच्याकडून थांबलाय या विषयाला फार महत्त्व देऊ नये.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यकारभाराकडे अत्यंत डोळसपणे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.