दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच यंदापासून नववीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे. त्यामुळे शाळेचा दहावीचा निकाल चांगला लागण्यासाठी विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्तीर्ण केले तरी या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे. जूनमध्ये या परीक्षा घेण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे.

शाळांचा दहावीचा निकाल चांगला लागल्याचे दिसावे म्हणून अनेक विद्यार्थ्यांना नववीच्याच वर्गात अनुत्तीर्ण करण्याचा प्रकार शाळांमध्ये घडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार नववीला अनुत्तीर्ण केल्यामुळे साधारण ९ टक्के विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचेही शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्याप्रमाणे फेरपरीक्षा घेण्यात येते त्याप्रमाणेच नववीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवडय़ात शाळांनी ही परीक्षा घ्यायची आहे.

विद्यार्थी ज्या विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला असेल, त्याच विषयाची परीक्षा त्याने द्यायची आहे. फेरपरीक्षेसाठीही नववीच्या सरासरी मूल्यमापन पद्धतीप्रमाणेच मूल्यमापन करण्यात येणार आहे.

‘नववीसाठीही फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून करण्यात येणार आहे. त्यानुसार आता नववीची परीक्षा दिलेल्या आणि त्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळू शकेल. अनेक शाळांचा दहावीचा निकाल अगदी नव्वद टक्क्यांपेक्षा पुढे असतो. मात्र, त्याच शाळांचा नववीचा निकाल जेमतेम ८० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही एक संधी मिळावी या उद्देशाने फेरपरीक्षेचा निर्णय घेण्यात आला.’

       – गंगाधर मम्हाणे,  माध्यमिक शिक्षण संचालक