कर्जत आणि कसारा येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी २९ मार्चपासून उपनगरी गाडीच्या जादा फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे कल्याणच्या पुढे कर्जत मार्गावर जलद गाडी सुरू करण्यात येणार आहे. तर पुढील सहा महिन्यामध्ये १५ डब्यांचीही गाडी या मार्गावर सुरू करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकाचे आणि यार्डाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर ठाणे येथून कर्जतसाठी आणि कसारासाठी जादा फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मध्य रेल्वेकडे एसीडीसी विद्युतीकरणातील गाडय़ांची संख्या कमी असल्याने ही मागणी मान्य करता येत नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत होते. तथापि, प्रवाशांच्या मागणीचा रेटा लक्षात घेऊन एसीडीसी गाडय़ांची कमतरता असली तरीही ११ फेऱ्या सुरू करण्यात येत असल्याचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले.
ठाणे-कर्जत दरम्यान पाच तर ठाणे-कसारा दरम्यान सहा अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार आहेत. कल्याणच्या पुढे कर्जत मार्गावर तसेच कसारा मार्गावर विद्युतीकरणामध्ये सुधारणा करण्यात आली असून एसी विद्युतप्रवाह या मार्गावर आहे. या जादा फेऱ्यांमुळे उपनगरी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
कल्याणच्या पुढे कर्जत मार्गावर जलद गाडी सुरू करण्यात येणार असून अंबरनाथ, बदलापूर, नेरळ आणि कर्जत येथे ही गाडी थांबेल, असे महाव्यवस्थापकांनी सांगितले. यामुळे या मार्गावरील फेऱ्या वाढविणे शक्य होणार असून सहा महिन्यांमध्ये १५ डब्यांच्या गाडीच्याही फेऱ्या सुरू करण्यात येतील, असे ते म्हणाले.