आठवडय़ाची मुलाखत : पल्लवी दराडे  (आयुक्त अन्न व औषध प्रशासन)

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील मोठमोठय़ा सार्वजनिक मंडळांमध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात. गणेश मंडळांनी दिलेला प्रसाद श्रद्धापूर्वक भक्तिभावाने ग्रहण करतात. प्रसाद ग्रहण करताना तो दूषित किंवा त्याच्या दर्जाबाबत योग्य काळजी न घेतल्याने आरोग्याकरिता अपायकारक ठरू शकतो अशी शंका भविकांच्या मनात येत नाही. मावा भेसळ रोखण्यापलीकडे प्रसादाच्या तपासणीकडेही आतापर्यंत फारसे लक्ष दिले गेलेले नाही. यंदा प्रथमच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ७० हून अधिक गणेश मंडळे व प्रसादाच्या वितरकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्याशी केलेली ही बातचीत.

* गणेश मंडळांना बोलावून प्रसादाबाबत जनजागृती करावीशी तुम्हाला का वाटली?

गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या काळात पनवेल, कल्याण या भागातून मिठाईसाठी वापला जाणारा भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला होता. सणासुदीच्या काळात अशाप्रकारे छापे मारले जातात. कारण या काळात माव्याची मागणी वाढते. मंदिरांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रसादाबाबत मात्र आपण दुर्लक्ष करतो. आतापर्यंत दुकानदार व मंदिर विश्वस्तांना बोलावून त्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम घेण्यात आला नव्हता. केवळ कारवाई करणे हे अन्न व औषध प्रशासनाचे काम नसून समाजात अन्नपदार्थ व औषधांच्या दर्जाबाबत जनजागृती करणे हे प्राथमिक काम आहे. यानंतर कारवाईचा बडगा उगारला जाईल. या मोहिमेत मंडळे व दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक दुकानदारांना अन्न सुरक्षिततेसाठी दिलेल्या नियमांची माहिती नव्हती. हे प्रशिक्षण यापूर्वीच घ्यायला हवे होते, असेही काहींनी आम्हाला सांगितले. एक दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये दर्जेदार प्रसाद तयार करताना काय काळजी घ्यायला हवी ते सांगण्यात आले. आम्ही त्यांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. सध्या सिद्धिविनायक मंदिरात केंद्राच्या अन्न सुरक्षेचे नियम सांभाळून प्रसाद तयार केला जात आहे. यासाठी मंदिरातील स्वयंपाकघरात अनेक बदल करण्यात आले आहेत. सिद्धिविनायक येथील प्रसाद यापूर्वी अमेरिकेत स्वीकारला जात नव्हता. मात्र प्रसाद तयार करताना काळजी घेण्यात आल्याने आता हा प्रसाद परदेशातही पाठविला जात आहे.

* गणेश मंडळांना प्रसाद तयार करण्यासाठी कोणते नियम पाळणे बंधनकारक आहेत?

कायद्याने अन्न सुरक्षेला महत्त्व दिले आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम व नियमन २०११ मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमानुसार प्रसाद तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल किंवा अन्नपदार्थ परवानाधारक व्यावसायिकाकडून खरेदी करणे बंधनकारक आहे. तसेच प्रसाद तयार करणारी व्यक्ती अथवा संस्था बदलली असेल तरी त्याची माहिती अद्ययावत करून घ्यावी. फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी ओळखीच्या परवाना व नोंदणीधारकाकडून करणे आवश्यक आहे. सण-उत्सवांच्या काळात फळांना मागणी जास्त असते. अनेकदा काही विक्रेते फळे लवकर पिकविण्यासाठी रसायनांचा वापर करतात. यामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी खरेदीदारांनी जागरूक असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रसाद तयार करताना कच्च्या वा सडलेल्या फळांचा वापर करू नये. प्रसाद तयार करणारे आचारी यांनी टोपी, हातमोजे या गोष्टी घालणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अशुद्ध पाण्यामुळे अतिसार, पटकी किंवा पोटाचे आजार उद्भवतात. त्यामुळे भाविकांना दिले जाणारे पिण्याचे व प्रसाद तयार करण्यासाठी लागणारे पाणी शुद्ध असावे. तसेच प्रसाद तयार करणारी व्यक्ती संसर्गजन्य आजारांपासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करावी. दूध व दुग्धजन्य पदार्थ थंड राहण्यासाठी कमी तापमानावर साठवून ठेवावे. खवा व माव्याची वाहतूक, साठवणूक शीतगृहे असलेल्या वाहनातूनच करावी. शिळा मावा प्रसादासाठी वापरू नये. त्याशिवाय प्रसाद तयार करावयाचा परिसर स्वच्छ ठेवावा.

* दर्जेदार प्रसादाच्या या मोहिमेमध्ये सर्वसामान्य कसा सहभाग नोंदवू शकतात?

अन्न व औषध प्रशासनाकडे मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी अन्न सुरक्षा अधिकारी असल्याने प्रत्येक भागात जाऊन जनजागृती करणे शक्य नसते. यामुळे नागरिकांनीही प्रसादाबाबत सतर्क असणे आवश्यक आहे. गणेशोत्सवादरम्यान कुठल्याही मंडळामध्ये प्रसादाबाबत दुर्लक्ष करीत असल्याचे दिसल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. नागरिकांना मंडळांबाबत संशय आल्यास त्यांनी १८००२२२३६५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. तक्रारीनंतर त्या भागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यामार्फत पुढील कारवाई करण्यात येईल.

* अन्न सुरक्षेची मोहीम राज्यभर पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत कोणकोणते प्रयत्न सुरू आहेत?

मुंबईतील गणेशोत्सव मंडळानंतर आम्ही राज्यभरातील मंदिरांमध्ये मिळणाऱ्या प्रसादाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष मोहीम सुरू करणार आहोत. यामध्ये राज्यातील लहान-मोठय़ा मंदिरांचा समावेश असेल. या मंदिरांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रसादाचा दर्जा केंद्राच्या अन्न सुरक्षा नियमाप्रमाणे असणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सहआयुक्तांना त्यांच्या भागातील महत्त्वाच्या मंदिरांची यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढल्या महिन्यात जिल्हा पातळीवर या मंदिरांच्या विश्वस्तांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येईल.

* या प्रशिक्षणातून वितरक व मंडळे जागृत होतील असे वाटते का?

हो नक्कीच. दरवेळेस कारवाई करून सुधारणा होणार नाही. या प्रशिक्षण मोहिमेच्या निमित्ताने आम्ही वितरक व मंडळांपर्यंत पोहोचलो आहोत. त्यांनाही आमच्याशी संवाद साधता आला. या ७० मंडळांपैकी किमान ५० मंडळे तरी प्रसाद तयार करण्याच्या नियमावलीचे पालन करतील असा आमचा विश्वास आहे. यापूर्वी केवळ कारवाईदरम्यान मंडळांशी किंवा दुकानदारांशी संबंध येत होता. परंतु, यंदा जनजागृतीच्या निमित्ताने संवाद वाढला आहे. सुधारणा या केवळ हातात दंडुका घेऊन होत नाहीत. त्याची सुरुवात प्रशिक्षण व जनजागृतीने केली तर परिणाम नक्कीच सकारात्मक होतील.