१ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी सोय

मुंबई-ठाणे खाडीत रोहित पक्ष्यांचे (फ्लेमिंगो) आगमन लांबल्याने ऐरोली येथील ‘किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रा’ची ‘फ्लेमिंगो दर्शन फेरी’ही उशिरा सुरू होण्याची चिन्हे आहेत. कच्छमधून ठाणे खाडीत स्थलांतर करणाऱ्या ‘फ्लेमिंगो’च्या निरीक्षणासाठी या केंद्रातून दिवा आणि वाशीच्या दिशेने बोटी सोडल्या जातात. जैवविविधता केंद्राच्या प्रशासनाकडून जानेवारी महिन्यातच या फेऱ्या सुरू करण्याचा विचार होता. मात्र फ्लेमिंगोचे स्थलांतर अजूनही पूर्णपणे न झाल्याने १ फेब्रुवारीपासून ही फेरी सुरू करण्यात येणार आहे.

खारफुटी क्षेत्रातील अधिवासच्या जैवविविधतेविषयी माहिती देणारे केंद्र कांदळवन संरक्षण विभागाने ऐरोली खाडीलगत उभारले आहे. या केंद्रात माहिती देणारी दोन मोठी दालने असून खेकडय़ांची शेती, खाडी निरीक्षण, फ्लेमिंगो दर्शन असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. पक्षीनिरीक्षकांना आणि सामान्य नागरिकांना फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन करता यावे याकरिता येथून बोटी सोडल्या जातात. मात्र दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मोठय़ा संख्येने स्थलांतर करणारे प्लेमिंगो पक्ष्यांचे थवे तुरळक  संख्येने ठाणे खाडीत दाखल होत आहेत. जे थवे दाखल झाले आहेत ते वाशी खाडी परिसर आणि गोदरेज कांदळवन क्षेत्रात विहार करीत असल्याचे दिसत आहे.

केंद्रामध्ये असणाऱ्या तीन बोटींच्या साहाय्याने फ्लेमिंगो दर्शन घडविले जाते. त्यासाठी प्रतिप्रवासी ३०० रुपये फेरीशुल्क आकारण्यात येते. तसेच गटाद्वारे फ्लेमिंगोंचे निरीक्षण करण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये शुल्क आकारून बोट उपलब्ध करून दिली जाते. दर वर्षी साधारण डिसेंबर महिन्याच्या अखेपर्यंत ठाणे खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन पूर्ण होत असल्याने यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून फेरीला सुरुवात करण्याचा विचार होता, मात्र आता ती फेब्रुवारीपासून सुरू होईल, असे व्यवस्थापक मनीष झेंडेकर यांनी सांगितले.