मनसे अध्यक्ष राज ठाकरे 23 जानेवारी रोजी काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र ते त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलणार हे नक्की झालंय कारण त्यांच्या पक्ष चिन्हातून झेंडा काढण्यात आला आहे आणि फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आलं आहे. MNS Adhikrut या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसतं आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित मानलं जातं आहे. मात्र त्याचसोबत राज ठाकरे कोणता झेंडा हाती घेणार? हा प्रश्नही उपस्थित होतो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये दोनदा दोन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये काय बोलणं झालं ही माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र भाजपा आणि मनसे यांची युती होऊ शकते अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं. मनसेने कार्यपद्धतीत काही बदल केले तर युती शक्य आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र राज ठाकरे यांच्याकडून यासंदर्भात काहीही वक्तव्य समोर आलेलं नाही. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राजकारणात कुणीही कुणाचा फार काळासाठी शत्रू नसतो असं सूचक वक्तव्य केलं होतं. आता मनसेने ट्विटर अकाऊंटवरुन झेंडाही हटवला आहे. त्यामुळे भगवा झेंडा हाती घेऊन राज ठाकरे हिंदुत्त्वाच्या वाटेवर जाणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. बॅनरही ठरले होते चर्चेचा विषय विचार महाराष्ट्र धर्माचा निर्धार हिंदवी स्वराज्याचा असं मनसेचं पोस्टर 17 जानेवारी रोजी झळकलं होतं. तसंच 17 जानेवारीच्या सकाळी शिवसेना भवनाच्या समोर राज ठाकरे महाराष्ट्र धर्म सम्राट या आशयाचं पोस्टरही लावण्यात आलं होतं. या दोन पोस्टर्सची चर्चा पुढचे दोन दिवस चांगलीच रंगली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे अशी चर्चा रंगली आहे. हा अवकाश भरुन काढण्यासाठी राज ठाकरे पुढाकार घेतील अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात ते काय भूमिका घेणार हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. २३ जानेवारी २०२० रोजी मुंबईत होणाऱ्या #मनसे_अधिवेशनाचा नेत्रदीपक उद्घाटन सोहळा मनसे अध्यक्ष @RajThackeray ह्यांच्या हस्ते सकाळी ठीक ९ वाजता पार पडणार आहे. आपला नम्र, शिरीष सावंत, नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. pic.twitter.com/hjdKEiTHYy — MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 20, 2020 मनसे अधिवेशानसंदर्भातलं एक ट्विट MNS Adhikrut वर पोस्ट करण्यात आलं आहे. मनसे अधिवेशनाचा नेत्रदीपक सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता पार पडणार आहे. असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.