दर नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी

गणेशोत्सव काळात अव्वाच्या सव्वा वाढणारा फुलांचा दर नियंत्रित करण्याच्या मागणीकडे या वर्षीही राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने महागाईने होरपळलेल्या मुंबईकरांना या वर्षीही सणासुदीला चढय़ा दरानेच खरेदी करावी लागते आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या फुलबाजार भलताच तेजीत आला आहे. गणेशोत्सवापूर्वी सुमारे पाच-दहा रुपयांना मिळणारा हार सध्या ५०-६० रुपयांना, तर पूर्वी सुमारे २० ते ४० पैशांना मिळणाऱ्या गणपतीच्या आवडत्या जास्वंदीच्या फुलाचा दर २ ते ४ रुपयांपर्यंत चढला आहे. महागाईत होरपळलेल्या सर्वसामान्य भाविकांना ही महागडी फुले आणि हार खरेदी करणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ने पुढाकार घेऊन फूलबाजारातील ‘तेजी’ नियंत्रित करण्याचे साकडे सरकारला घातले. परंतु निवडणुकीच्या काळात ‘अच्छे दिन’ आणण्याच्या घोषणा करणाऱ्या सरकारने याबाबत असमर्थता दर्शविल्याने केवळ समन्वय समितीचे पदाधिकारीच नव्हे, तर मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे.
फुले नाशिवंत प्रकारात मोडतात. सरकार त्यावर कोणताही कर आकारत नाही. असे असतानाही गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या श्रद्धेचा फायदा उठवत फुलांची दामदुपटीने विक्री केली जाते. या प्रकाराला आळा बसावा आणि भाविकांची होरपळ थांबावी या उद्देशाने ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ने पुढाकार घेत सरकारदरबारी धाव घेतली होती. गणरायाला अर्पण करण्यासाठी आवश्यक असलेल्या फुलांच्या दरांवर नियंत्रण आणावे अशी मागणी समन्वय समितीने दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. परंतु अशा पद्धतीने फुलांच्या दरांवर नियंत्रण आणण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे समन्वय समितीला आश्चर्याचा धक्काच बसला. ‘अच्छे दिन’ आणू म्हणणाऱ्या सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याने समन्वय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पाच ते दहा पट दराने फुलांची विक्री
गणेशोत्सव म्हटला की जास्वंदी, गुलछडी, लीली, चाफा, गुलाब, झेंडू, मोगरा आदी फुलांना तेजीचे दिवस येतात. मागणी लक्षात घेऊन फूलबाजारांमध्ये त्यांची आवकही मोठय़ा प्रमाणात होते. या काळात मुंबईमधील फूलबाजार निरनिराळ्या रंगीबेरंगी फुलांच्या सुवासाने दरवळून जातात. परंतु गणेशोत्सवातील वाढत्या मागणीचा फूलविक्रेते पुरेपूर फायदा उठवत आहेत. काही दिवसांपूर्वी पाच-दहा रुपयांना मिळणारा लहान हार सध्या ५०-६० रुपयांना मिळत आहे. गजाननाला आवडणारी जस्वंदीची फुले एरवी शेकडा २० रुपये दराने विकली जातात. परंतु गणेशोत्सवाच्या आदल्या दिवसापासून जास्वंदीचे दर आभाळाला भिडू लागले. शेकडा २० रुपये दर २०० रुपयांवर जाऊन पोहोचला. झेंडूच्या फुलांना तर जवळजवळ सर्वच सणांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. एरवी १५-२० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडूची फुले गणेशोत्सवात सुमारे ८० रुपयांपेक्षा अधिक दराने खपविली गेली. गुलझडीने तर किमतीची परिसीमाच गाठली. इतर दिवशी ४० रुपये किलो दराने गुलछडी विकली जाते. पण यंदा गणेशोत्सवात तब्बल ५०० रुपये प्रतिकिलो दराने गुलछडी विकली गेली. पूर्वी २०० रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा मोगरा तब्बल ६०० रुपये प्रतिकिलो दराने भाविकांच्या पदरात पडला.   लिलीच्या ५० कळ्यांचे २ रुपयांचे बंडल भाविकांना २० रुपयांना खरेदी करावे लागले. ६० ते ८० रुपये शेकडा दराने मिळणारा चाफा ३०० रुपये शेकडा दराने विकला गेला. तर गणपतीला प्रिय असलेली दुर्वाही या महागाईतून सुटली नाही. गणेशोत्सवापूर्वी एक-दोन रुपयांची जुडी चक्क दहा रुपये घेऊन भाविकांच्या हातावर टेकविण्यात आली.  आपल्या लाडक्या गणरायाला त्याच्या आवडीचे फूल वाहिल्याशिवाय भाविक राहिले नाहीत. खिशाला परवडत नसतानाही महागडी फुले खरेदी करून गणरायाला अर्पण केली.