बुद्धीचा दाता गणरायाला बुधवारी राज्यभरात उत्सवी वातावरणात निरोप देण्यात आला. मात्र, सालाबादप्रमाणे यंदाही या उत्सवाला हाणामारी, गोळीबार, अपघात वगैरे घटनांनी गालबोट लागलेच. इचलकरंजी व कोल्हापुरात पोलीस व गणेशभक्त यांच्यात हाणामाऱ्या झाल्या तर मुलुंडमध्ये दोन मंडळांच्या वादात हवेत गोळीबार झाला. एकूणच विसर्जन मिरवणुकीत सुबुद्धीचेच विसर्जन झाल्याचे चित्र काही ठिकाणी होते.
इचलकरंजीत पोलिसांवर हल्ला
इचलकरंजी येथील झेंडा चौकात बुधवारी मध्यरात्री गुरुकन्नननगरातील अष्टविनायक गणेश मंडळाच्या मूर्तीस धक्का लागला. हा धक्का पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्याकडून लागल्याचा आरोप करीत कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्याला पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर चिडलेल्या जमावाने गावभाग पोलीस ठाण्यावर हल्ला करत पोलिसांना मारहाण केली. यात सात पोलीस गंभीर जखमी झाले.
मुलुंडमध्ये गोळीबार
मुलुंड येथील वीर संभाजी नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व बाळगोपाळ गणेश मंडळ यांची मिरवणूक पूर्वेकडील विसर्जन घाटावर एकाच वेळी आली. आधी कोणत्या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करायचे यावरून दोन्ही मंडळात वाद निर्माण झाला. वादादरम्यान बाळगोपाळ गणेश मंडळाच्या राजेश कदम या कार्यकर्त्यांने हवेत गोळीबार केला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. नवघर पोलिसांनी याप्रकरणी कदम याच्यासह तिघांना अटक केली आहे.
कुल्र्यात मिरवणूक रोखली
कुल्र्यातील हलाव पूल येथे पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान लावण्यात आलेले डीजे बंद केले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या या निर्णयाविरोधात सर्व मंडळांनी एकत्र येऊन गणेश विसर्जनच न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे अडीच तास मिरवणूक खोळंबली. अखेर मंडळांच्या हट्टापुढे नमते घेत पोलिसांनी डीजेला परवानगी दिली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता गणेशमूर्तीचे विसर्जन झाले.
दोघांचा मृत्यू
चेंबूरच्या जैस्वाल मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक माटुंग्याच्या गांधी मार्केटसमोरून जात होती. मंडळाचे कार्यकर्ते ट्रकवरून मिठाई वाटत होते. आयुष गुप्ता (५) हा मुलगा मिठाई घेण्यासाठी ट्रकजवळ गेला. गर्दीमुळे तो ट्रक खाली सापडून जागीच ठार झाला. वसईच्या पापडी गावातील ऋषभ पवार (१९) हा मिरवणुकीच्या  ठिकाणी ट्रकची धडक लागून ठार झाला.
कोल्हापुरात दगडफेक  
शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाने कोल्हापुरात लेझर शो, टीव्ही स्क्रीन, डॉल्बीसह मिरवणूक काढली होती. मिरवणूक शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत मंडपाजवळ आल्यावर काही काळ रेंगाळली. गर्दी झाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी पोलिसांना मिरवणूक पुढे ढकलण्याची सूचना केली. या वेळी कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची सुरू झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात चार पोलिसांसह आठ जण जखमी झाले.