चालक रुग्णवाहिकांवर; अनेक भागांत कचरा पडून; दरुगधीसोबत साथीच्या आजारांची भीती

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाबाधित आणि संशयितांना रुग्णालय अथवा करोना काळजी केंद्रात पाठवणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णवाहिकांवर पालिकेच्या कचरावाहू गाडय़ांवरील चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे चालकांअभावी पालिकेच्या काही कचरावाहू गाडय़ा यानगृहातच उभ्या आहेत. परिणामी, अनेक भागात कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत.

टाळेबंदीमुळे मुंबईमधील कचऱ्याचे प्रमाण निम्म्यावर घसरून कचरावाहू गाडय़ांच्या फेऱ्या कमी झाल्या. दरम्यानच्या काळात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्ष, करोना काळजी केंद्र, करोना आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यास सुरुवात झाली. त्यासाठी रुग्णवाहिका कमी पडू लागल्या. म्हणून ‘बेस्ट’ने कंत्राटावर घेतलेल्या लाल मिनी बसगाडय़ा आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पिवळ्या मिनी बसगाडय़ा पालिकेने घेतल्या. करोनाबाधित रुग्ण, संशयित रुग्णांची ने-आण करण्यासाठी या बसगाडय़ांचा वापर सुरू झाला. मात्र चालकांचा तुटवडा निर्माण झाला. कचरावाहू गाडय़ांच्या फेऱ्या कमी झाल्याने या चालकांची या तात्पुरत्या रुग्णवाहिकांवर नियुक्ती करण्यात आली. तर कंत्राटी पद्धतीने काही चालकांची भरती करण्यात आली.

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर मुंबईमधील कचऱ्याचे प्रमाण प्रतिदिन ५ हजार ५०० मेट्रिक टनावर पोहोचले आहे. त्यामुळे कचरागाडय़ांच्या फेऱ्या वाढविण्याची नितांत गरज आहे. मात्र चालकांच्या अपुऱ्या संख्येमुळे काही कचरावाहू गाडय़ा यानगृहातच खोळंबल्या आहेत. परिणामी अनेक भागातील कचरा वेळीच उचलला जात नाही. दरुगधी आणि अस्वच्छतेमुळे साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने रहिवासी त्रस्त आहेत.

एक हजार ७२४ तक्रारी

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील १९१६ क्रमांकावर १ मे ते १५ जून या काळात नागरिकांनी आपल्या भागात कचरा साचल्याबाबतच्या एक हजार ७२४ तक्रारी केल्या होत्या. त्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्यानंतर तो कचरा उचलण्यात आला, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. चालक नसल्याने बहुसंख्य ठिकाणी कंत्राटदाराच्या कचरावाहू गाडय़ा पाठविण्यात येत आहेत. भविष्यात हे सर्व काम कंत्राटदाराच्या खिशात जाऊन पालिकेचे चालक अतिरिक्त होतील अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.