29 May 2020

News Flash

अल्पपरिचय – गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे

१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले.

| June 3, 2014 11:25 am

गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. परळी, जिल्हा बीड येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे यांच्या घरी झाला. मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. मुंडे यांनीही वयाच्या १४ व्या वर्षापासून सात वर्षे वारी केली. १९६९ मध्ये त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. २१ मे १९७८ रोजी मुंडे यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मते-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.

राजकीय कारकिर्द
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. वयाच्या ऐन पंचविशीत १९७० मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९७८ साली बीडजिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.
१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0 मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५ मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा विजयी झाल्यानंतर एनडीए सरकारमध्ये त्यांची केंद्रीय ग्रामविकासमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2014 11:25 am

Web Title: gopinath munde a mass leader from maharashtra politics
Next Stories
1 लढवय्या लोकनेता हरपला; महाराष्ट्रासह देशभरातून शोकाकूल प्रतिक्रिया
2 गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यदर्शनासाठी मुंबई-लातूर विशेष रेल्वे
3 कॅम्पाकोला वासियांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; कारवाई अटळ
Just Now!
X