11 August 2020

News Flash

रेमडेसिविर आणि टोसीलीझुमॅब वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे

रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर अंकुश

रुग्णालयांच्या मनमानी कारभारावर अंकुश

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब या औषधांच्या वापराबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे ही औषधे नेमक्या कोणत्या अवस्थेतील करोना रुग्णांना द्यावीत, याची सुस्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य विभागाने शनिवारी जाहीर केली. त्यामुळे खासगी रुग्णालयांना यापुढे कोणत्याही रुग्णासाठी मनमानी पद्धतीने या औषधांची मागणी करता येणार नाही.

खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतेक रुग्णांना रेमडेसिविर अथवा टोसिलिझुमॅब औषध देण्याबाबत डॉक्टरांचा आग्रह असतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांत या औषधांची मागणी कमालीची वाढल्याने काही ठिकाणी काळाबाजारही सुरू झाला. शेवटी अन्न आणि औषध प्रशासनाला याची दखल घेत कारवाई सुरू करावी लागली.

कोणत्याही औषधाचा जसा फायदा असतो, तसेच त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. मुळात रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब ही औषधे कोणत्या रुग्णांना द्यावीत, त्याचे प्रमाण किती असावे, याबाबत निश्चिती असण्याची आवश्यकता आहे. यकृत, मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त वा गर्भवती महिला व मुलांना रेमडिसिवीर दिले जाऊ नये, असे मुंबईतील करोना मृत्यूंचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

ज्या रुग्णांना न्यूमोनिया वा क्षयरोग आहे अशांना टोसिलिझुमॅब देऊ नये. रेमडिसिवीर हे विषाणू प्रतिबंधक औषध असून, साधारणपणे पंधरा टक्के लोकांना ते उपयुक्त ठरते असे आढळून आले आहे. तसेच टोसिलिझुमॅब औषध देण्यापूर्वी डेक्सामिथाझॉन हे औषध देऊन त्याचे परिणाम तपासून आवश्यक वाटल्यास टोसिलिझुमॅब औषध द्यावे, अशी भूमिका डॉ. सुपे यांनी मांडली.

रेमडिसिवीर व टोसिलिझुमॅब ही औषधे सरसकट देऊ नयेत. अशी स्पष्ट भूमिका मुंबई टास्क फोर्सचे सदस्य व लीलावती रुग्णालयातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी मांडली.

नियमावली काय?

* कमी गंभीर आणि गंभीर रुग्णांसाठीच रेमडेसिविरचा वापर केला जावा, तसेच ५० वर्षांच्या आतील रुग्ण किंवा ६० वर्षीय रुग्णाच्या प्रकृतीचा विचार करून टोसिलिझुमॅब वापरले जावे. रुग्ण अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल हवा, तसेच सायटोकाईन स्टॉर्म असणे आवश्यक आहे. रुग्णाची ऑक्सिजनची पातळी व तापाचे प्रमाणही टोसीलीझुमॅब वापरताना किती असावे याचे प्रमाण आरोग्य विभागाने ठरवून दिले आहे.

* ही औषधे कोणत्या करोना रुग्णांना देऊ नयेत तेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार ज्या रुग्णांना जिवाणू संसर्ग आहे वा एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाले आहेत किंवा हृदयविकाराचा त्रास आहे, रक्तपेशी ५० हजांरापेक्षा कमी आहेत अशा करोना रुग्णांना ही औषधे देऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

* त्याचप्रमाणे ज्या करोना रुग्णांना ही औषधे द्यायची आहेत त्यांना कोणत्या प्रमाणात या औषधांचे डोस दिले पाहिजे तेही सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाने जगभरातील या विषयावरील तज्ज्ञांची मते अभ्यासली तसेच भारतातील तज्ज्ञ, आयसीएमआरची मार्गदर्शक तत्त्वे आदींचा आढावा घेऊन रेमडेसिविर व टोसिलिझुमॅब या औषधांच्या वापराबाबची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 4:51 am

Web Title: government issue guidelines on the use of remdesivir and tocilizumab zws 70
Next Stories
1 Coronavirus : राज्यातील रुग्णसंख्या अडीच लाखांवर
2 अमिताभ बच्चन यांचे चारही बंगले टाळेबंद
3 अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपुढे  शैक्षणिक कर्ज, शासकीय अभ्यासवृत्तीचा पेच
Just Now!
X