21 September 2020

News Flash

उंच ध्वजस्तंभांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

मुंबईमध्ये उंच ध्वजस्तंभ उभारून राष्ट्रध्वज फडकविण्याची मुंबईमधील लोकप्रतिनिधींमध्ये अहमहमिका लागली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रसाद रावकर

उभारणीसाठी आलेल्या अर्जात वाढ; राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी निर्णय

मुंबईमध्ये उंच ध्वजस्तंभ उभारून राष्ट्रध्वज फडकविण्याची मुंबईमधील लोकप्रतिनिधींमध्ये अहमहमिका लागली आहे. मात्र योग्य काळजी न घेतल्यामुळे डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याची शक्यता आहे. तिरंग्याचा मान आणि सुरक्षितता जपण्यासाठी ध्वजसंहितेनुसारच मुंबईत उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवण्यास परवानगी देण्यात येणार असून याबाबतचे नवे धोरण आखून मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाला १६० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून २०१६ मध्ये कलिना संकुलामध्ये १५० फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता. या ध्वजस्तंभावर ३० बाय ४० फूट आकाराचा राष्ट्रध्वज फडकत होता. विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने विद्यापीठाने हा राष्ट्रध्वज फडकविला होता. मात्र काही महिन्यांनी अचानक ध्वजस्तंभावरून राष्ट्रध्वज गायब झाला. यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत होता. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी उंच ध्वजस्तंभ उभारून २४ तास राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. गेट वे ऑफ इंडियासह अन्य काही ठिकाणी उंच राष्ट्रध्वज उभारण्यास परवानगी मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींनी पालिका दरबारी वाऱ्या सुरू केल्या आहेत. उपनगरांमधील काही लोकप्रतिनिधींनी तसे प्रयत्न सुरू केले आहेत.

उंच ध्वजस्तंभ उभारून मोठ्ठा राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होऊन त्याचा अवमान होण्याची अधिक शक्यता असते. तसेच राष्ट्रध्वजाची सुरक्षाही महत्त्वाची असते. उंच राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होते. पावसाळ्यात या राष्ट्रध्वजाची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसामुळे राष्ट्रध्वजाची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा राष्ट्रध्वज फडकत राहिल्यास त्याचा अवमान होऊ शकतो. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी पालिकेने नवे धोरण आखून कडक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या धोरणामध्ये राष्ट्रध्वजाची सुरक्षितता आणि अवमान होणार नाही या बाबींची विशेष काळजी घेऊन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार आहेत. उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकविण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना त्याची अखंडपणे देखभाल कोण करणार याची हमी द्यावी लागणार आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, त्याच्या सुरक्षेला बाधा येणार नाही याचीही हमी संबंधितांना द्यावी लागणार आहे. या धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास असमर्थ ठरणाऱ्या अर्जदारांना मुंबईमध्ये उंच ध्वजस्तंभ उभारून राष्ट्रध्वज फडकविण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात येणार नाही, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

मुंबईमध्ये ध्वजसंहितेचे पालन करूनच राष्ट्रध्वज फडकवता येईल. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, त्याचे संरक्षण व्हावे यासाठी काळजी घेण्यात येत आहे.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 1:40 am

Web Title: guiding guidelines for tall flag column
Next Stories
1 वायुसेनेच्या तळात घुसखोरी
2 उरलेल्या अन्नाच्या वाटपावर निर्बंध?
3 टाटा पॉवर कंपनीचा ईमेल हॅक
Just Now!
X