विलेपार्लेकरांच्या आंदोलनाला यश

चौफेर लेखन अआणि आपल्या कलाविष्काराने असंख्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या दिग्गजांची नावे मागे सारून विलेपार्ले येथील एका बडय़ा शो रूमच्या मालकाच्या कुटुंबातील एका महिलेचे नाव नेहरू रोडवरील चौकाला दिल्यामुळे विलेपार्लेकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. या चौकात संबंधित महिलेचा पुतळाही बसविण्यात आला होता. मात्र स्थानिक रहिवाशांच्या उद्रेकानंतर पालिकेने राज्य सरकारच्या नियमावर बोट ठेवल्यामुळे अखेर संबंधितांनी या चौकातील पुतळा हटविला.

विलेपार्ले येथील नेहरू रोडवरील चौकास शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या शिफारशीवरून या परिसरातील एका बडय़ा शो रूमच्या मालकाच्या कुटुंबातील लक्ष्मीबेन भारमल छाडवा या महिलेचे नाव देण्यात आले. इतकेच नव्हे तर तेथे लक्ष्मीबेन छावडा यांचा अर्धपुतळाही बसविण्यात आला. विलेपाल्र्यामध्ये अनेक दिग्गज मंडळींचे वास्तव्य होते. त्यामध्ये पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, माधव वाटवे आदी साहित्य आणि कलाक्षेत्रातील नामवंत मंडळींचा समावेश आहे. या मंडळींना डावलून या महिलेचे नाव चौकाला देण्यात आल्यामुळे पार्लेकरांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या. समाजसेवेत अथवा विलेपाल्र्याच्या जडणघडणीत लक्ष्मीबेन छाडवा यांनी नेमके कोणते योगदान केले, असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत होता. या प्रश्नाला ‘लोकसत्ता’च्या २९ मार्च २०१७ च्या अंकामध्ये ‘पाल्र्यातील चौकाला अज्ञात महिलेचे नाव, मराठी साहित्यिक, रंगकर्मीच्या नावाचे पालिकेला वावडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘लोकसत्ता’ने या विषयाला वाचा फोडताच पालिका अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले होते. पु. ल. देशपांडे यांचे बंधू उमाकांत यांचे पुत्र जयंत देशपांडे, डॉ. शशी वैद्य, ‘पार्ले पंचम’ संस्थेचे श्रीधर खानोलकर आदी दिग्गज मंडळींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. या चौकात बसविलेला लक्ष्मीबेन छाडवा यांचा अर्धपुतळा काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विलेपार्ले परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारने पुतळे बसविण्याबाबत नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार लक्ष्मीबेन छाडवा यांचा अर्धपुतळा चौकात बसविता येत नाही. ही बाब संबंधित कुटुंबाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानुसार या कुटुंबाने हा पुतळा काढून घेतल्याची माहिती, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.