गोरेगाव पूर्व येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील प्रकार; गोंधळ आवरण्यासाठी पोलिसांची मदत

पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्यानंतर सुरू झालेला चलनकल्लोळ दोन आठवडे उलटले तरी सुरूच आहे. बँका, एटीएमसमोरील गर्दी, नागरिकांची बाचाबाची, कर्मचाऱ्यांशी होणारे वाद आणि तासन्तास रांगेत उभे राहून कंटाळणारे नागरिक हे चित्र अजूनही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. कामाच्या ताणामुळे अनेक बँकांचे सव्‍‌र्हर काही काळ बंद पडत आहेत. दिवसभरात ठरावीक कूपनधारकांनाही पसे देण्यात बँका असमर्थ ठरत असल्याने नागरिकांचा राग आता अनावर होत आहे.

गोरेगाव येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेचा सव्‍‌र्हर बंद पडल्याने नागरिक आणि बँकेचे कर्मचारी यांच्यात सोमवारी बाचाबाची झाली. सकाळी आठ वाजल्यापासून रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्या नागरिकांना अखेर रिकाम्या हाताने घरी जाण्यास बँकेने सांगितल्याने संतापलेल्या नागरिकांनी बँकेबाहेर गोंधळ सुरू केला.

गोरेगाव पूर्व येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत सोमवारी नागरिक आणि बँकेचे कर्मचारी यांच्यात मोठी वादावादी झाली. बँकेचा सव्‍‌र्हर दुपारी एक वाजता बंद पडल्याने सकाळी आठपासून रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांचा राग अनावर झाला. त्यातून सुरू झालेला गोंधळ आवरण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. बँक कर्मचाऱ्यांशी तब्बल एक तास घातलेल्या वादानंतर सव्‍‌र्हर सुरू झाला. परंतु काही जणांना पसे दिल्यानंतर बँकेने पसे संपल्याचे कारण सांगून लोकांना घरी परत जाण्यास सांगितले.

कूपन दिलेल्यांना तरी बँकेने पैसे द्यावेत

‘गेल्या काही दिवसांमध्ये एचडीएफसी बँकेचे सव्‍‌र्हर अनेकदा बंद पडत असल्याने सकाळपासून रांगेत उभे राहूनही लोकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. दिवसभरात अंदाजे ७० जणांना पसे दिल्यावर बँकेचे पसे संपतात कसे? कधी बँकेची वेळ संपते तर कधी पसे संपतात. बँकांकडून रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्या नागरिकांचा अंत पाहिला जात आहे,’ अशी संतापजनक प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी नोंदविली. कूपन दिलेल्या लोकांना तरी बँकेने दिवसभरात पसे द्यायला हवेत, अशी मागणीही इथल्या नागरिकांनी केली आहे.