रा. स्व. संघाशी संबंधित अनेक संस्थांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधितांना आधार देण्यासाठी कार्य सुरू केले आहे. रुग्णांच्या मदतीसाठी सुमारे वीस संस्था एकत्र आल्या आहेत. प्लाझ्मा दाते आणि स्वीकारणारे यांची सूची, समुपदेशन, वैद्यकीय मदत, गृह विलगीकरणातील व्यक्तींना मदत अशा विविध प्रकारची मदत या सेवाप्रकल्पात केली जाणार आहे. यासाठी  मदतक्रमांक ०२२- ४१६ ६७ ४६६ सुरू करण्यात आला आहे.

रा. स्व. संघ जनकल्याण समिती, केशवसृष्टी माय ग्रीन सोसायटी, सेवा सहयोग, सेवांकुर, निरामय सेवा संस्था, आरोग्य भारती, समिधा, हेल्थ काँन्सेप्ट, राष्ट्रीय सेवा समिती, चिंगारी सेवा फाऊंडेशन, नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन, समस्त महाजन अशा विविध संस्थांचा या अभियानात समावेश आहे. या अंतर्गत प्लाझ्मा दाते आणि स्वीकारणारे यांची सूची तयार करण्यात येत आहे. सेवांकुर संस्थेच्या माध्यमातून हे कार्य करण्यात येत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांना बेड,  ऑक्सिजन काँसन्ट्रेटर आणि व्हील चेअर अशी मदत केली जाणार आहे. सेवा वस्त्यांपर्यंत ऑक्सिजन काँसन्ट्रेटर पोहोचवण्याचे आव्हान संस्थांपुढे आहे. कोरोनाशी लढणाऱ्या कुटुंबांचे मनोबल खच्ची होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे. होमिओपॅथी, अ‍ॅलोपथी आणि आयुर्वेदिक औषधांसंबंधी मार्गदर्शन सुविधाही तज्ज्ञांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे

कोरोना संक्रमणामुळे आज संपूर्ण कुटुंबेच होम क्वारंटाईन होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा कुटुंबांसाठी वा एकट्याच राहणाऱ्या व्यक्तीसाठी १४ दिवस वा आवश्यकतेनुसार भोजनाचे डबे मोफत देण्याची व्यवस्थाही मुंबईच्या दहिसर ते गोरेगाव या टप्प्यात करण्यात आली आहे.  अधिक माहितीसाठी ९८१९८६८५७५ किंवा ८५९१३३६५८९ या  क्रमांकावर संपर्क साधावा .