पश्चिम रेल्वे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे २०० जवान तैनात करणार

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात मोठय़ा संख्येने नवीन पादचारी पूल व जुन्या पादचारी पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतल्यानंतर सध्या प्रवाशांना मोठय़ा गर्दीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापर्यंत ही कामे सुरू राहणार असल्याने गर्दी होऊन एखादी दुर्घटना होऊ नये म्हणून त्याच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे सुरक्षा दलाने आपल्याकडील मनुष्यबळाचा वापर करण्याऐवजी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने पश्चिम व मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ३०० पेक्षा जास्त जवान महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ४०० जवान लवकरच मध्य व पश्चिम रेल्वे ताफ्यात दाखल केले जातील.

वांद्रे कलानगर, अंधेरी, माहिम, वसई, मालाड येथील उड्डाणपुलांची व त्यावरील पादचारी मार्गिकेची दुरुस्ती जुलैपर्यंत, याशिवाय चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेन्ट्रल, महलक्ष्मी, प्रभादेवी, दादर स्थानकांतील प्रत्येकी एक, खार स्थानकातील दोन, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड स्थानकांतील एका पादचारी पुलांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर चार स्थानकांत नव्याने पादचारी पूल उभारले जातील. यात वांद्रे स्थानकात दोन, खार, माहिम स्थानकांचा समावेश आहे. पावसाळापर्यंत कामे सुरू राहणार असल्याने जादा कुमक तैनात करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांची बैठकही झाली. यात गर्दी व्यवस्थापन व नियंत्रणासाठी आणखी २०० एमएसएफ तैनात करण्याचा निर्णय झाला असून येत्या १५ दिवसांत रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखलही होतील. सध्या रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, २३२ पुरुष एमएसएफ आणि ९७ महिला एमएसएफ आहेत.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांमध्येही पादचारी पूल व फलाटांवरील छताची कामे होत आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी नव्याने दाखल होणारे २०० होमगार्ड तैनात केले जाणार होते. मात्र निवडणुकीच्या कामांमुळे होमगार्ड एक महिन्यानंतर मिळणार असल्याने तोपर्यंत मध्य रेल्वेकडून एमएसएफ मिळवण्याचा प्रयत्न आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला स्थानकातील दोन पादचारी पूल बंद केल्यानंतर आता भांडुप, विक्रोळी, कल्याण, दिवा यासह एकूण १० पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेने ११५ पादचारी पूल व २९ उड्डाणपुलांची पाहणी केली. २८ उड्डाणपूल सुरक्षित असून फक्त लोअर परळ स्थानकाबाहेरील उड्डाणपूलच असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले व तो तात्काळ रहदारीसाठी बंदही केला आहे. मध्य रेल्वेवरील ८९ उड्डाणपूल, १९१ पादचारी पूल आणि १९ अन्य पुलांची पाहणी केली. पाहणी केलेल्या पादचारी पुलांपैकी अवघा मुंब्रा स्थानकातील पादचारी पूल असुरक्षित होता आणि तो पाडण्यात आला, तर १० पुलांची किरकोळ दुरुस्ती केली जाणार आहे.

रेल्वे सुरक्षा दलाचे जवान निवडणुकीच्या कामांत व्यस्त

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ६५ रेल्वे सुरक्षा दलाचे जवान व पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील २४० जवान हे लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तैनात केले जाणार आहेत. त्यामुळे गर्दी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेतली जाणार आहे.

२०० होमगार्डना मंजुरी मिळाली आहे; परंतु ते निवडणुकीनंतरच मिळतील. तोपर्यंत महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान ताफ्यात दाखल करून घेण्याचा प्रयत्न आहे.    – अश्रफ के.के. (वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे)