|| निशांत सरवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एचडीआयएल’च्या ‘व्हिस्परिंग टॉवर’वर लिलावाची टांगती तलवार 

बांधकाम क्षेत्रात एकेकाळी बडे प्रस्थ असलेल्या ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (एचडीआयएल) या कंपनीने मुलुंडमधील गृहप्रकल्पासाठी घेतलेले कर्ज न फेडल्याने प्रकल्पच लिलावात काढण्याची सूचना कर्जदार बँकेने प्रसिद्ध केली होती. परंतु तूर्तास बँकेने ही प्रक्रिया थांबविली असली तरी ती पुन्हा सुरू करण्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे १३०० घरांच्या या प्रकल्पातील साडेचारशे मध्यमवर्गीय ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे, परंतु दखल घेण्यात आलेली नाही. महापालिकेनेही या मालमत्तेवर जप्ती आणली आहे.

मुलुंड पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गावर ‘व्हिस्परिंग टॉवर’ या १३०० घरांच्या प्रकल्पाची २०११ मध्ये ‘एचडीआयएल’ने घोषणा केली. एचडीआयएल ही कंपनी तेव्हा बांधकाम क्षेत्रात आघाडीवर असल्यामुळे साडेचारशेहून अधिक मध्यमवर्गीयांनी घरांसाठी नोंदणी केली. ८० लाख ते एक कोटी किमतीत ८०० ते हजार चौरस फुटाचे घर तसेच अन्य सुविधा यामुळे या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला. ४० मजल्यांच्या प्रत्येकी चार विंग असलेल्या दोन इमारती बांधण्यात येणार होत्या. त्यापैकी एफ-जी विंगचे कामही सुरू झाले. १९ मजल्यापर्यंत काम जोमात झाले, पण नंतर ते थंडावले. लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन कंपनी देत होती. परंतु सात वर्षे होत आली तरी काम सुरू न झाल्याने ग्राहक हवालदिल झाले होते. त्यातच या प्रकल्पाच्या लिलावाची जाहिरात अलाहाबाद बँकेने प्रसिद्ध केल्यानंतर ग्राहकांच्या तोंडचे पाणीच पळाले. त्यांनी एचडीआयएलच्या वांद्रे येथील मुख्यालयात धाव घेतली, पंरतु त्यांना थातूरमाथूर उत्तरे देण्यात आली. अखेर संतापलेल्या ग्राहकांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर अलाहाबाद बँकेने या गृहप्रकल्पाची लिलाव प्रक्रिया मागे घेत असल्याची नोटीस प्रसिद्ध केली. मात्र तीत भविष्यात असा लिलाव करण्याबाबत बँक नव्याने नोटीस प्रसिद्ध करू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या ग्राहकांवर टांगती तलवार आहे.

या प्रकरणी काही ग्राहकांनी अलाहाबाद बँकेशी पत्रव्यवहार सुरू केला. बँकेने पत्रांना उत्तरे देताना, आपल्या गुंतवणुकीबाबत ग्राहकांनी एचडीआयएलशी संपर्क साधावा, असा सल्ला दिला. दिलेल्या कर्जाची वसुली करण्याची जबाबदारी बँकेची आहे. सरफेसी कायद्यानुसार कर्जवसुलीसाठी बँकांना मिळालेल्या अधिकारानुसार कारवाई करण्याचा बँकेचा अधिकार असल्याचेही ग्राहकांना कळविण्यात आले. तसे झाल्यास  गृहस्वप्न धुळीस मिळणार अशा चिंतेत ग्राहकांनी एचडीआयएलच्या वांद्रे येथील मुख्यालयावर ठिय्या आंदोलनीचा इशारा दिला आहे.  एचडीआयएलचे संचालक सारंग वाधवान हे शनिवारी या ग्राहकांशी चर्चा करण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.

मुलुंडमधील गृहप्रकल्पाबाबत दिलेली लिलावाची नोटीस अलाहाबाद बँकेने मागे घेतली आहे. त्यामुळे याबाबत निर्माण झालेली भीती संपुष्टात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  – राकेश वाधवान, संचालक, एचडीआयएल 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing development and infrastructure limited
First published on: 22-09-2018 at 01:29 IST