News Flash

पवईत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत मासेमारी

मुंबई शहरातील प्रमुख व मोठय़ा तलावांपैकी एक असलेल्या पवई तलावाला सध्या ग्रहण लागले आहे.

पवईत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत मासेमारी

माशांसह कासवांचीही चोरी; मुंबई महानगरपालिका आणि वनविभागाचे दुर्लक्ष
पवई तलावाला जलप्रदूषणाचा फटका बसत असतानाच येथील जैवसंपदेचीदेखील चोरी होत आहे. तलावात मोठय़ा प्रमाणावर मत्स्यसंपदा असून ती अनधिकृत मासेमारांकडून फस्त करण्यात येत आहे. माशांसोबत जाळ्यात आलेल्या कासवांचाही सौदा केला जात आहे. किमान २५-३० अनधिकृत मच्छीमारांचे टोळके हे प्रताप करीत असून त्यांच्या या कृष्णकृत्यांकडे मात्र मुंबई महानगरपालिका आणि वनविभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे.
मुंबई शहरातील प्रमुख व मोठय़ा तलावांपैकी एक असलेल्या पवई तलावाला सध्या ग्रहण लागले आहे. तलावात प्रवेश करण्यासाठी सामान्यांना बंदी असून या बंदीचे फलक संपूर्ण तलाव परिसरात ठाणे वन विभागाकडून लावण्यात आले आहेत. तसेच तलावात मगरींचे अस्तित्व असल्याची चेतावनीही देण्यात आली आहे. त्यामुळे मासेमारी व अन्य कारणांसाठी तलावात उतरण्यासाठी बंदी असतानाही येथे मच्छीमारांचे टोळके थेट पाण्यात ट्रकसारख्या वाहनांच्या चाकांच्या रबरी टय़ूब घेऊन पाण्यात उतरतात. या वेळी सोबत आणलेले जाळे ते पाण्यात टाकून मासेमारी करतात, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. बहुतेकदा या जाळ्यांमध्ये कासवेदेखील येतात. अशा कासवांची ‘सिंगापुरी कासव’ या नावाखाली बाजारात चढय़ा भावाने विक्री करण्यात येते. मात्र, त्यांच्यावर लक्ष देण्यास कोणताही विभाग नसल्याने या चोरांचे फावते आहे. याचा परिणाम मात्र येथील प्राणिसंपदा झपाटय़ाने नष्ट होत आहे. याबाबत बोलताना ‘पॉझ’ या पर्यावरणवादी संस्थेचे सुनीश कुंजू म्हणाले की, येथे सकाळच्या वेळेत अनेक जण मासेमारीला येत असून निवडक मच्छीमारांचे टोळके दिवसभर मासेमारी करते. अनेकदा यांच्या जाळ्यात कासवे येतात. तसेच, आयआयटीजवळ गेल्याच वर्षी मगरीचे पिल्लू येऊन मृत्यू पडल्याची घटनाही घडली आहे. ही मासेमारी महापालिका व वनविभागाने तात्काळ थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, याबाबत महानगरपालिकेच्या तेथील साहाय्यक आयुक्तांसह अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी एकमेकांकडे व वन विभागाकडे बोटे दाखवली असून याबाबत ठाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

माशांचे प्रकार व किमती (अंदाजे)
मंगरू – १४० रुपये किलो
बाम – ४० ते ५० रुपये नग
रोहू किंवा तांबा – ८०० ते १००० रुपये किलो
कानोश्या – १५० रुपये किलो
कासव – १००० पासून पुढे
(आकारावर)

माशांमागचे अर्थकारण
पवई तलावात सापडत असलेले मासे हे गोडय़ा पाण्यातल्या माशांच्या जातीचे असून त्यांना खवय्यांमध्ये मागणी असते. पाच ते सहा इंच छोटय़ा माशांपासून ते दोन-अडीच फूट लांब मासे येथे सापडत असून निवडक माशांचे वजन १० किलोपर्यंतही असते. तसेच, तलावात माशांसोबत सापडलेली कासवेदेखील चढय़ा भावाने विकण्यात येत आहेत. हे मासे हजार रुपये किलोपर्यंत मुलुंड, ठाणे, कांजूरमार्ग आदी ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये विकण्यात येत असल्याचे कुंजू यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 3:25 am

Web Title: huge unauthorized fishing in powai lake
Next Stories
1 तपासचक्र : असाही पाठलाग..
2 देवनार कचराभूमीवर सव्वा कोटींची सुगंधी द्रव्य फवारणी
3 पालिका अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्यावर १ कोटी ४४ हजार रुपयांचा खर्च
Just Now!
X