जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकानं काहीही चुकीचं केलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे दीपिकाच्या कृतीला समर्थन दिले आहे.

चव्हाण म्हणाले, “जेएनयूमध्ये जे काही झालं त्याविरोधात आता सर्वजण बोलत आहेत. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या निषेध आंदोलनाला दीपिका पदुकोण हीनं पाठिंबा देणं यामध्ये मला काहीही चुकीचं दिसत नाही.”

दरम्यान, विविध कामगार संघटनांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राज्य सरकारचा पाठिंबा असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले. तसेच आंदोलन करायला भाग पाडणारं केंद्र सरकार हे कामगारविरोधी असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मंगळवारी रात्री विद्यापीठात पोहोचली होती. यावेळी तिने हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दीपिका आपला आगामी चित्रपट ‘छपाक’च्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. यावेळी तिने विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. दीपिका विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये पोहोचली होती. मात्र तिने कोणतंही भाषण केलं नाही. सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास दीपिका पोहोचली होती. यावेळी कन्हैयाकुमारने आजादीच्या घोषणा देण्यास सुरुवात करताच दीपिका उठून उभी राहिली होती.